सॅनिटायझरच्या बॉक्‍समधून गुटख्याची तस्करी

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाचा छापा

मुंबई

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचा गैरफायदा घेऊन सॅनिटायझरच्या बॉक्‍समधून गुटखा व पान मसाल्याची तस्करी करण्यात येत आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी येथे एका वाहनातून 38 लाखांचा पान मसाला जप्त केला.
सॅनिटायझरच्या नावाखाली कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भिवंडी तालुक्‍यातील राहनाळ येथे उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या वाहनातून महाराष्ट्रात बंदी असलेला 37 लाख 80 हजार रुपयांचा पान मसाला ताब्यात घेतला. त्याचप्रमाणे 14 लाखांचा शॅम्पूही या वाहनातून जप्त करण्यात आला. या प्रकरणी पंकज मोहन असोसिएट्‌स या वाहतूक कंपनीचा वाहनचालक राकेशकुमार अयोध्याप्रसाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित कंपनीविरोधात अन्नसुरक्षा कायदा (2006) व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर जप्त केलेल्या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येईल, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली.
 

संबंधित बातम्या