पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्काने दापोलीत गोंधळ

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

अहवाल येण्याआधीच या तरुणाच्या हातावर एका कर्मचाऱ्याने नजरचुकीने होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का मारला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले.

दाभोळ

मुंबईतून आलेल्या व दापोली येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात असताना एका कर्मचाऱ्याच्या नजरचुकीने होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का मारल्याने घरी गेलेल्या तरुणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. तरुणाला मंगळवारी (ता. 5) रात्रीच ताब्यात घेऊन त्याला कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याच्या नातेवाईकांना तसेच त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या अनेकांना आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दापोली तालुक्‍यातील शिर्दे गावचा व सध्या दापोलीतील काळकाई कोंड येथे राहत असलेला हा 24 वर्षीय तरुण गेले दोन दिवस अनेकांच्या संपर्कात आल्याने दापोलीत भीतीचे वातावरण आहे. तो दापोलीत दोन दिवस फिरत होता. तो क्रिकेटही खेळला. त्याने केस कापून घेतले होते. ज्याने त्याचे केस कापले त्याने आणखी दहा जणांचे केस कापले होते. तो तरुण आझाद मैदान येथे भाजी बाजारातही फिरला. तेथे थांबल्याचेही काही जणांनी सांगितले. त्याच्या संपर्कात आलेले सर्व आता धास्तावले आहेत.
मुंबईतून दहा जणांच्या गटामधून तो 28 एप्रिलला मंडणगडात पोचला; तेव्हा तेथे त्याला प्रशासनाने ताब्यात घेतले. त्याला दुसऱ्या दिवशी दापोली प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. त्या सर्वांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले. या सर्वांचे स्वॅबचे नमुने 2 मे रोजी घेण्यात आले. पैकी दोघांचा अहवाल मंगळवारी (ता. 5) पॉझिटिव्ह आला; मात्र अहवाल येण्याआधीच या तरुणाच्या हातावर एका कर्मचाऱ्याने नजरचुकीने होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का मारला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो कोठे आहे, याचा शोध प्रशासनाने घेण्यास सुरवात केली. तो काळकाई कोंड परिसरात राहात असल्याचे समजल्यावर प्रशासनाने संपूर्ण काळकाई कोंड परिसर रात्रीच सील केला. या भागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नगरपंचायतीने केले.

दोन मैत्रिणींचा शोध सुरू
या तरुणाच्या दोन मैत्रिणीदेखील असून त्यातील एक मुंबई येथे तर दुसरी दापोलीजवळील एका गावात राहात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्या दोघींचे पत्ते मिळविण्याचे काम नगरपंचायतीकडून करण्यात येत आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती जमा करण्याचे कामही नगरपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

संबंधित बातम्या