बळीराजाला मदतीचा हात- मुख्यमंत्री ठाकरे

A helping hand to Baliraja CM
A helping hand to Baliraja CM

मुंबई : महाराष्‍ट्रात जून ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या फेरउभारणीसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते.


निकषांपेक्षा अधिक मदत
या बैठकीनंतर माध्यमप्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकांसाठी राज्य सरकारने ‘एनडीआरएफ’च्या निकषांपेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जिराईत आणि बागाईत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठी ही मदत निकषांप्रमाणे मदत देण्यात येईल.’’

पायाभूत सुविधांसाठी निधी
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतपिकांप्रमाणेच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला या सुविधांच्या फेरउभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या १० हजार कोटी रुपयांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ५५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रस्ते आणि पूल यासाठी  २६६५कोटी, नगरविकास विभागासाठी  ३००कोटी, महावितरण आणि ऊर्जा विभागासाठी २३९ कोटी, जलसंपदा विभागास १०२  कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा विभागास १ हजार कोटी, रुपयांचा‍ निधी देण्यात येईल. अतिवृष्टीने रस्ते, पूल, विजेच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा योजना, घरे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत इमारती आणि शेतजमिनीचे जे नुकसान झाले त्याची कामे या निधीतून केली जाणार आहेत. 

दिवाळीपूर्वी मदत पोहोचवा
माझ्यासह सर्व विभागाच्या मंत्र्यांनी राज्यभर फिरून आपत्तीचा आढावा घेतला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘संकट मोठे आहे, या संकटात राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सण समारंभापूर्वी ही मदत शेतकरी आणि नुकसानग्रस्तांच्या हातात पोहोचेल असा शब्द दिला होता. तो  पाळणार असून दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्तांना मदत पोहचवावी असे निर्देश मी प्रशासनाला दिले आहेत.’’


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com