गिरिस्थानांना चोरीचुपके पर्यटकांचा संसर्ग

Dainik Gomantak
रविवार, 14 जून 2020

पाचगणी, महाबळेश्‍वरात प्रशासनापुढे आव्हान; पोलिसांनी लक्ष घालण्याची गरज

रविकांत बेलोशे

भिलार

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायाला 31 जूनपर्यंत "ब्रेक' दिला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हे सकारात्मक पाऊल असले, तरी काही आत्मघातकी पर्यटक शासनाचे निर्बंध तोडून चोरी चुपके गिरिस्थानांची सैर करण्यासाठी सरसावू लागले आहेत. त्याला स्थानिक हॉटेल व्यावसायिक बळी पडत आहेत. मात्र, ही सर्वांसाठी धोक्‍याची घंटा ठरण्याची शक्‍यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणीकरांनी 100 टक्के लॉकडाउन कडकपणे पाळला. त्यामुळे कोरोनाचा धोका या पर्यटनस्थळांना संभावला नाही. असे असताना आता पर्यटकांची चोरी चुपके वर्दळ वाढली आहे. त्यातून कोरोना संसर्गाचा धोका पोचू शकतो. त्यामुळे येणाऱ्या पर्यटक रोखण्याचे आव्हान सध्या निर्माण झाले आहे. असे पर्यटक वाढू लागले, तर
कोरोनाला निमंत्रण देण्यासारखेच आहे. पाचगणी व महाबळेश्वरातील स्थानिक पोलिस प्रशासनाने येथील हॉटेल इंडस्ट्रीला सक्त नोटिसा बजावून जर कोणी शासनाच्या आदेशानुसार 30 जूनपर्यंत पर्यटक व पाहुण्यांचे कसलेही बुकिंग घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले असतानाही पर राज्यातील पर्यटक या गिरिस्थानाकडे कसे येताहेत हाच प्रश्न आहे.
पावसाळा तोंडावर आला असला, तरी प्रदीर्घ लॉकडाउनने नागरिक विचलित झाले आहेत. यातून चेंज आणि विरंगुळा म्हणून पाचगणी, महाबळेश्वरकडे पर्यटनाचा ओघ वाढू शकतो; परंतु तसे झाल्यास तालुक्‍याच्या कोरोना परिस्थितीवर परिणाम होणार आहे. अनेक ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याची शास्वती कोण देणार? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्यटनाच्या व्यवसायावर येथील जीवनमान अवलंबून आहे. सर्वच ठप्प झाल्यामुळे व्यावसायिकही अडचणीत आहेत; पण या परिस्थितीत घाई करून रिस्क घेणेसुद्धा व्यावसायिक, प्रशासन आणि नागरिकांना नकीच परवडणारे नाही. जिल्हाबंदी उठवलेली नाही आणि त्यातच अशा पद्धतीने पर्यटकांची आवक वाढली तर मात्र चिंता वाढणार आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पर्यटन व्यवसायावर संक्रांतच येणार आहे आणि त्यामुळे व्यवसायही ठप्प होऊन मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. शासनाचे आदेश येईपर्यंत आणि कोरोनाचा धोका संपत नाही तोवर कुठलाही पर्यटक पाचगणी, महाबळेश्वरात न येण्याची आणि कुठल्याही हॉटेल व्यावसायिकांनी बुकिंग न करण्याची खबरदारी सद्यःस्थितीत घेणे गरजेचे आहे.

""महाबळेश्वर तालुक्‍यात शासनाचे नियम झुगारून बाहेरून जर पर्यटक येत असतील आणि कोरोनाचा धोका वाढणार असेल, तर त्यांना वेळीच पायबंद घालायला हवा. शासनाचे बुकिंग न घेण्याचे आदेश असतानाही जर कोण हॉटेल व्यावसायिक बुकिंग करून आरोग्याची चिंता वाढवत असतील, तर त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.''

- सुनील उंबरकर, व्यावसायिक

संबंधित बातम्या