''होळी दारात नाही पेटवायची, तर  मग काय घरात पेटवायची का? ''

दैनिक गोमंतक
रविवार, 28 मार्च 2021

राज्यसरकार हिंदू सण-उत्सवाना विरोध करते. पण इतर धर्मियांच्या सणांना तातडीने परवानगी दिली जाते,

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यसरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून राज्यातील जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. गर्दीची ठिकाणे टाळणे, सामाजिक अंतर राखणे, अशा अनेक सूचना राज्यसरकारने जारी केल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सर्व सण-समारंभांवरदेखील बंदी घातली आहे. तसेच,  होळीच्या निमित्ताने लोक एकत्र येऊन संसर्गाचा धोका अधिक वाढू नये, यासाठी होळीवरदेखील निर्बंध लादले आहेत. याच मुद्द्यावरून राज्यातील भाजपा आमदार राम कदम यांनी याविषयी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. 

Corona Update : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय 
  
'रंगपंचमीला गर्दी होऊ शकते, एकमेकाना स्पर्श होऊ शकतो, हे सर्व आम्ही समजू शकतो, मात्र नियमांचे पालन करून होळी पेटवली तर त्याला राज्यसरकारचा विरोध का, असा सवाल राम कदम यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर सत्तेत आल्यापासून राज्यसरकार हिंदू सण-उत्सवाना विरोध करते. पण इतर धर्मियांच्या सणांना तातडीने परवानगी दिली जाते, मग ते काय कोरोनाचे नातेवाईक लागतात का, असे अनेक सवाल कदम यांनी ट्विट द्वारे विचारले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम लागू केल्यानंतर राम कदम यांनी सरकारवर टीका केली आहे. संयम राखून होळी साजरी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.  होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची?असा सवाल राम कदम यांनी ठाकरे सरकारला केला आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. याअंतर्गत, 15 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी रात्री 8 नंतर पाच जणांनी एकत्र येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच, पब, मॉल आणि समुद्रकिनारे याठिकाणी रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत एकत्र जाण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर बाद राहणार असून घरी पार्सल सेवा सुरू राहील असेही या निएमवली दिले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळावे यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. 
 

संबंधित बातम्या