बाळासाहेबांच्या सिद्धांतांना सोडून सेनेनं सत्ता मिळवली; अमित शहांचा टोला

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेत बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात घडलेल्या विस्तवाबाबत बोलताना, अमित शहा यांनी शिवसेनेला बंद दाराआड कोणतेही वचन दिले नसल्याचे सांगितले. भाजपने विधानसभेच्या निवडणुकीअगोदर मुख्यमंत्री पदासह सत्तेत पन्नास-पन्नास टक्के वाटा देण्याचे मान्य केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. व त्यानंतर आज पहिल्यांदाच कोकणातील सिंधुदुर्ग येथे बोलताना गृहमंत्री अमित शहा यासंदर्भात बोलत, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांवर तोफ डागली. 

''अन्नधान्याला तिजोरीत बंद करता येणार नाही'' 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उदघाटनासाठी म्हणून अमित शहा सिंधुदुर्ग येथे आले होते. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेत बोलताना, राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. अमित शहा यांनी आपण भाजपच्या अध्यक्षपदी असताना, राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्याचे सांगितले. व त्यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक भाजपने लढविली असल्याचे म्हणत, मात्र त्यानंतर राज्यात भलतेच तीन चाकी सरकार सत्तेत आल्याचे अमित शहा यावेळेस म्हणाले. तसेच जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीला जनादेश मिळाला होता, असे अमित शहा सांगितले. परंतु याचा अपमान करत वेगळेच सरकार सत्तेत आले असून, या महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली. 

याशिवाय उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधताना, काही लोक म्हणतात की भाजपने बंद खोलीत आश्वासने दिली होती, व समजा ही आश्वासने दिली होती तर मग, जाहीर सभेत प्रत्येक ठिकाणी बोलताना युतीचे सरकार येणार असून देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे कशाला सांगितले असते, असे अमित शहा म्हणाले. तसेच आपण कोणतीही गोष्ट बंद दाराआड करत नसल्याचा चिमटा काढत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली व त्यानंतर पुन्हा जनतेचा अपमान केल्याचा आरोप अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. त्यानंतर यापुढे बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडून देत सत्ता मिळवली असल्याची बोचरी टीका अमित शहा यांनी केली. 

त्यानंतर, शिवसेनेला आव्हान देताना भाजप हा सिद्धांतासाठी राजकारणात असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. तर शिवसेना ही सिद्धांतांचा वापर राजकारणासाठी करून घेत असल्याचे अमित शहा म्हणाले. त्यामुळे भाजप कधीही शिवसेनेच्या सिद्धांत नसलेल्या मार्गावर चालणार नसल्याचे पुढे सांगत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना अशाच प्रकारे भाजप चालला असता, तर आज शिवसेना पक्ष राहिलाच नसता असे गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग येथे बोलताना म्हणाले.        

संबंधित बातम्या