बंद शाळांची कोंडी फुटणार कशी?

Dainik Gomantak
बुधवार, 3 जून 2020

कोरोनामुळे शाळा बंद असून, दरवर्षी 15 जूनला सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष यंदा कधीपासून सुरू होईल. याबाबत पालकांना योग्य ती माहिती प्राप्त होत नसल्याने पालकांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.

जळगाव

 "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून सर्व शाळा बंद आहेत. परीक्षाही रद्द झाल्या आहेत. शिक्षकांनी मागील चाचणी परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकालही घोषित केले. परंतु केंद्र व राज्य शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या घोषणांनी शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शाळा सुरू करण्याचे अद्याप नियोजनही नाही. त्यामुळे ही कोंडी फुटणार कधी, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

शिक्षण विभाग "नॉट रिचेबल'
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी नेहमीच "स्वीच ऑफ' असतात. जिल्हा परिषदेच्या कार्यालयातही ते दिसून येत नसल्याने विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस कोणाला जबाबदार धरावे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पालकांमध्ये संभ्रम
कोरोनामुळे शाळा बंद असून, दरवर्षी 15 जूनला सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष यंदा कधीपासून सुरू होईल. याबाबत पालकांना योग्य ती माहिती प्राप्त होत नसल्याने पालकांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांचे काय?
राज्य शासन सर्व शाळांना ऑनलाइन शिक्षणावर भर देण्याच्या सूचना करीत आहेत. परंतु शहरी भागात इंटरनेट सेवा बऱ्यापैकी उपलब्ध होत असतात. ग्रामीण भागात मात्र अनेक तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर याचा परिणाम जाणवणार आहे.

शाळांमधील क्वारंटाइन
केंद्राच्या स्वच्छतेचे काय?

"कोरोना' संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे कामगार, मजूर व नोकरदार वर्ग आपापल्या मूळ गावी परतत असल्याने त्यांची तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था अनेक शाळांमध्ये करण्यात आली आहे. परंतु आगामी काळात शाळा सुरू झाल्यास त्याठिकाणी संसर्गाचा धोका उद्‌भवणार असून, तेथील स्वच्छतेचे काय? असा प्रश्‍न देखील पालकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

शाळा सुरू करण्याचे नियोजनच नाही
आगामी नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू करण्याच्या शासनाच्या हालचाली असून, याबाबत जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग मात्र अलिप्त असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही शाळेच्या नियोजनाबाबत मुख्याध्यापकांना शिक्षण विभागातर्फे कोणत्याही सूचना किंवा मार्गदर्शन मिळत नसल्याने जिल्ह्यातील शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती किती क्रियाशील आहे हे दिसून येते.

संबंधित बातम्या