... तर कोरोना कसा हरणार?

dainik gomantak
बुधवार, 13 मे 2020

लोकमान्य टिळक रुग्णालयात कोव्हिड विषाणूग्रस्ताच्या मृतदेहाजवळच रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आणि त्यानंतर रुग्ण पळून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांवरून प्रशासनावर टीका करण्यात आली.

मुंबई,

कोणीही कोणाचे मनोबल खचवू नये. सद्यस्थिती नेहमीच्या साथरोगाची नाही. अशा कठीण काळात आपणच आपले पाय खेचले, तर कोरोना कसा हरणार? असा व्यथित सवाल एका परिचारिकेने केला आहे.
शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात कोव्हिड विषाणूग्रस्ताच्या मृतदेहाजवळच रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आणि त्यानंतर रुग्ण पळून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांवरून प्रशासनावर टीका करण्यात आली. या टीकेमुळे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती जाणूनच टीका करावी, असे आवाहन सायन हॉस्पिटलमधील अधिपरिचारिका सीमा कांबळे यांनी समाज माध्यमावरून केले आहे.
बॉम्बस्फोट, प्रलयंकारी पाऊस, पावसाळ्यातील साथ रोग अशा संकटांच्या काळात सेवेसाठी तत्पर असलेल्या परिचारिका रुग्णालय प्रशासनावर होणाऱ्या टीकेमुळे घायाळ झाल्या आहेत. रुग्णालय प्रशासनावर टीका म्हणजे डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय, आया, तंत्रज्ञ अशा प्रत्येक घटकांवर टीका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. रुग्ण व परिचारिका यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. कोरोनाच्या साथीत हे प्रमाण अधिक व्यस्त झाले आहे, परंतु आजही कोरोना वॉर्डात पाय रोवून रुग्णसेवा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या रुग्णसंख्या अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहे. एक परिचारिका 40 ते 50 रुग्णांची काळजी घेत आहे. पीपीई किट घालून रुग्णसेवा करणे जिकिरीचे असूनही, हे काम अविरत सुरू असल्याचे सीमा कांबळे सांगतात. रुग्णही अज्ञानातून टीका करतात. अशा व्यक्तीने सकारात्मक बाजूही दाखवावी; उगाच टीका केल्यास कर्मचाऱ्यांचे मनोबल खचेल, असे परिचारिका मीनाक्षी गायकवाड म्हणतात.

ड्युटी सुरूच...
सायन हॉस्पिटलमधील पाच वॉर्ड कोरोना रुग्णांनी भरल्यावर वॉर्ड क्रमांक 6 कोरोना वॉर्ड करण्याचे आयत्या वेळी ठरले. मध्यरात्री 12 वाजता त्या नव्या कोरोना वॉर्डात दोन रुग्ण दाखल झाले. सकाळपर्यंत तो वॉर्ड कोरोना रुग्णांनी पूर्ण भरला. त्यानंतरही कोरोनाचे रुग्ण दाखल होत होतेच. अशी परिस्थिती हाताळणारे आम्ही कर्मचारी "ड्युटी संपली' असे कधीच सांगत नाहीत, असे अधिपरिचारिका सीमा कांबळे म्हणाल्या.

रुग्णालय प्रशासनही काम करत आहे. दोनचार गुंडाळलेले मृतदेह दाखवल्यामुळे विपरित परिणाम होईल. प्रशासन झोपेत असते, तर रुग्ण या आजाराने रस्त्यावर पडलेले दिसले असते...
- सीमा कांबळे, अधिपरिचारिका, सायन हॉस्पिटल

संबंधित बातम्या