'बामणघळीत' सेल्फीच्या नादात पडून पती-पत्नीचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 3 जानेवारी 2021

तालुक्‍यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या जोडप्याचा घळीत पडल्याने मृत्यू झाला.

गुहागर :  तालुक्‍यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या जोडप्याचा घळीत पडल्याने मृत्यू झाला. पत्नी सुचिता माणगावकर (वय ३३) हिचा सेल्फी घेताना तोल गेला. तिला पकडण्यासाठी पती आनंद माणगावकर (वय ३६) धावले; मात्र दोघेही धोकादायक घळीत पडले. त्यांना बाहेर काढेपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील अनंत माणगावकर, सुचिता माणगावकर, आनंद माणगावकर त्यांची आई आणि भाचा असे वाहनाने हेदवी समुद्रकिनाऱ्यावर पोचले. हे बामणघळ पाहण्यासाठी गेले. भाचा अनंत माणगावकर, त्यांची पत्नी सुचिता माणगावकर घळीच्या किनाऱ्यावरील दगडात उभे राहून समुद्राचे घुसळत आत शिरणारे आणि कारंज्यासारखे उडणारे पाणी पाहत होते. सुचिता या समुद्राचे वेगाने घळीत शिरणारे पाणीदेखील सेल्फीसोबत टिपण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्याचवेळी अचानक आलेल्या लाटेने सुचिताचा तोल गेला. पत्नी पडत असल्याचे लक्षात आल्यावर आनंद यांनी सुचिताला पकडण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने दोघेही घळीत पडले. भरतीची वेळ असल्याने वेगाने घुसळणाऱ्या पाण्यातून बाहेर पडणे या दोघांना शक्‍य झाले नाही. लाटांच्या जोरदार घुसळणीत ती दोघं घळीतील दगडांवरही आपटले असावेत.चालकाने हे पाहिल्यावर मदतीसाठी आरडाओरडा केला. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातील स्थानिक तरुण धावत पोचले. दोघेही घळीत न दिसल्याने स्थानिक तरुण आपला जीव धोक्‍यात टाकून समुद्राचे पाणी घळीत शिरते त्या खडपात पोचले.  अर्ध्या तासांनी घळीच्या मुखातून पती-पत्नी समुद्रात वाहत असताना दिसली. गळ टाकून स्थानिकांनी दोघांना खडकातून पाण्याबाहेर काढले परंतु दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या