दिल्लीत सुरू; मग साताऱ्यातच बंद का?

अवित बगळे
रविवार, 26 जुलै 2020

उदयनराजेंचा सवाल; लॉकडाउन उठविण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सातारा

किती दिवस लोकांना घरात थांबवून ठेवणार? दहा ते दोन या वेळेत कोरोना नाही आणि दोननंतर कोरोना बाहेर येतो का? दिल्लीत सर्व काही सुरू आहे, मग साताऱ्यात बंद का? साताऱ्यातही सर्व काही लवकरात लवकर सुरू करा, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी शासनाबरोबर प्रत्येकाची असून, त्या पद्धतीने वागले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसोबत उदयनराजेंनी आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्या उपाययोजनांची गरज आहे, याचे निवेदनही दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीत सर्व व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडे किती दिवस लॉकडाउन ठेवणार, किती दिवस लोकांना घरात बसून राहा, असे सांगणार आदी प्रश्‍न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, ""काहींचे हातावर पोट असून, काहींनी कर्ज काढले आहे. त्यांना बॅंकांनी मुभा दिली असली, तरी लॉकडाउन उठल्यावर या व्यावसायिकांना मागील व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे लोक गप्प बसणार नाहीत. लोकांचा संयम सुटला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. अशी स्थिती प्रत्येक जिल्ह्यात होईल.''
कोरोना रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने काही उपाय सुचवले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी दाखवून त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केल्यास कोरोना नियंत्रणात येईल. दिल्लीत होम क्वारंटाइनची पद्धत राबविली जात आहे. तेथे सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांना घरीच थांबवून उपचार करण्यास परवानगी दिली जाते. तीच पद्धत सातारा जिल्ह्यात लागू करावी. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले.
लॉकडाउन करून तुम्ही काय मिळविले, असा प्रश्‍न उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला. प्रत्येकाने स्वत:वर बंधने घातली पाहिजेत. जिल्हा रुग्णालयासह कोविड सेंटरमध्ये नर्सिंग स्टाफ कमी पडत आहे. त्यांची तातडीने भरती केली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयात फिजिशियनची गरज आहे. त्यासाठी शासनाने पाठपुरावा करून थोडे जास्त पगार दिल्यास निश्‍चित चांगले डॉक्‍टर येतील.

खासदार, आमदार फंड वापरा
डॉक्‍टरांचे सामाजिक दायित्व निधी व मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फंड हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे उपाययोजनांवर खर्च करता येईल. त्यासाठी हा निधी कोरोनासाठी वळवावा, अशी सूचना उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. खासदार व आमदारांचा निधीही वापरावा. त्यासाठी असलेले नियम शिथिल करून तो निधी वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या