आज निर्णय नाही घेतला तर उद्या लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवेल; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

आज आपण लॉकडाऊन सारखा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात राज्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल.

मुंबई: देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते आणि मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीमध्ये संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, ‘’रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, आज आपण लॉकडाऊन सारखा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात राज्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल,’’ अस सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या काळात लॉकडाऊन सारखा निर्णय़ घेतला जाणार असल्याचं दिसत आहे.

या ऑनलाईन बैठकीमध्ये राज्य़ाचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी सहभाग घेऊन राज्यशासनाला योग्य त्य़ा सूचनाही केल्या. तर बैठकीच्या प्रारंभी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यतील कोरोनाची परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कशाप्रकारे तोंड देणार याची माहीती दिली. (If no decision is made today a lockdown situation will arise tomorrow Chief Ministers warning)

महाराष्ट्रात पूढील तीन  आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता  

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, ‘’कोरोनाचं चक्र थांबवण्यासाठी काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला सर्वप्रथम नागरीकांचा जीव वाचवण्यासाठी प्राधान्य द्यावं लागणार आहे. ही जर आरोग्याची आणिबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहीजे.’’

तसेच, ‘’विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडिसिव्हर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळवणे, प्रयोगशाळांसाठी योग्य त्या सूचना देणे, ऑक्सीजन त्वरीत उपलब्ध होण्यासाठी काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल. गेल्या वर्षी नागरिक जास्तीत जास्त घरी होते त्यामुळे संपर्क शोधणे सोपे होते. मात्र आता सर्व क्षेत्रे खुली करण्यात आल्यामुळे त्याच्यामध्ये काही व्यवहारीक अडचणी येत आहेत हे केंद्र सरकारने समजून घ्यायला हवं. मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील नामवंताशी संवाद साधत आहे. काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकाशीही बोललो. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये राज्यशासनाला सहकार्य करण्यासाठी सगळ्यांनी तयारी दाखवली आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की, राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्यामध्ये सर्वांनी सहकार्य द्यावे.’’ असे आवाहन देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

 

संबंधित बातम्या