आयआयटी विद्यार्थ्यांनी बनवले नेव्हिगेशन तंत्रज्ञान

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

मुंबई

ओला, उबर, स्विगी, झोमॅटो व अन्य कंपन्यांमध्ये किंवा गुगलच्या माध्यमातून व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करण्यात येतो. देशाच्या सीमेचे रक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीतही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या नेव्हिगेशन तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करत देशाला आत्मनिर्भर बनवण्याकडे पाऊल टाकले आहे.
जगातील अनेक देशांनी अवकाशात उपग्रह सोडले आहेत. या उपग्रहांतून येणाऱ्या रेडिओ लहरींचा विविध प्रकारे उपयोग होतो. दिशा दाखवण्याचे काम नेव्हिगेशनच्या माध्यमातून केले जाते. अनेक देशांच्या सॅटेलाईट नेव्हिगेशन सिस्टिम आहेत. अमेरिकेची ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियाची ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम (ग्लोनास), युरोपची गॅलेलिओ, चीनची बैडू आणि जपानची क्वासी- झेनिथ सॅटेलाईट सिस्टिम (क्‍यूझेडएसएस) या प्रणाली कार्यरत आहेत. भारतानेही देशी बनावटीची इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम (आयआरएनएसएस) किंवा परदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेली नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (नाविक) या प्रणाली कार्यान्वित केल्या आहेत.
1999 मधील कारगिल युद्धात शत्रूची स्थिती समजण्यासाठी भारताला परदेशी जीपीएस प्रणालीवर अवलंबून राहावे लागले होते. त्यामुळे संबंधित देशाकडून माहिती मिळेपर्यंत परिस्थिती बदललेली असे. त्यातूनच भारताला स्वत:ची उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली विकसित करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली. त्यामुळे कारगिल युद्धानंतर काही वर्षांतच भारताने इस्रोच्या माध्यमातून आयआरएनएसएस आणि नाविक या उपग्रह प्रणाली कार्यान्वित केल्या. परंतु त्यासाठी आवश्‍यक असलेली व्यावसायिक चिप आपल्याकडे नसल्यामुळे अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते.
या पार्श्‍वभूमीवर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी नाविक आणि जीपीएसच्या प्रणालीद्वारे नागरी परिस्थिती दर्शवण्यासाठी "ध्रुव' ही आरएफ फ्रंट-एंड इंटिग्रेटेड सर्किट चिप (आयसी चिप) तयार केली आहे. पृथ्वीपासून अत्यंत दूर असलेल्या उपग्रहांपासून येणारे संदेश (सिग्नल) अनेकदा फार क्षीण असतात. "ध्रुव' चिपमुळे या सिग्नलमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्यास मदत होईल. 1.176 गिगाहर्टझ, 1.227 गिगाहर्टझ, 1.575 गिगाहर्टझ, 2.492 गिगाहर्टझ या फ्रिक्वेन्सीला नेव्हिगेशन सिग्नलचे प्रक्षेपण करण्याची क्षमता या चिपमध्ये आहे. आणखी काही वैशिष्ट्यांसह ही चिप अधिक अत्याधुनिक बनवण्यावर विद्यार्थी काम करत आहेत. नाविक प्रणालीत वापरण्यास भारत सरकारने मान्यता दिल्यानंतर "ध्रुव' तंत्रज्ञान मोबाईल आणि अन्य साधनांमध्येही उपलब्ध होऊ शकते.

यांनी केली कामगिरी
आयआयटीमधील पीएच.डी. आणि एम.टेक.च्या विद्यार्थ्यांनी "ध्रुव' चिप तयार केली आहे. या चमूमध्ये विजय कंचेटला, संतोष ख्यालिया, अजिंक्‍य खारलकर, शुभम जैन, स्वेथा जोस, जेफीन जॉय, सयद हमीद, मुकुल पांचोली, सुमीत खालापुरे, अमितेश त्रिपाठी, प्रवीण खन्ना आणि साक्षी वस्त्राड यांचा समावेश आहे. प्राध्यापक राजेश झेले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही चिप तयार केली. या प्रकल्पावर 18 महिन्यांपासून काम सुरू होते. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत या चिपची संपूर्ण तपासणी आणि चाचणी केली आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी आयआयटी मुंबईकडून या चिपची यशस्वी चाचणी घेण्यात आली. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकल्पासाठी निधी दिला आहे.

अठरा महिन्यांच्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांना मिळालेले यश अविश्‍वसनीय आहे. आम्ही या प्रकल्पाला शून्यातून सुरुवात केली होती. पर्यावरणात येणाऱ्या अडचणींवर मात करणाऱ्या अनेक डिझाईन विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. हे संशोधन देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारे आहे.
- प्रा. राजेश झेले, आयआयटी, मुंबई.

संबंधित बातम्या