अमित शहा, शरद पवारांच्या कथित भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान 

दैनिक गोमंतक
सोमवार, 29 मार्च 2021

शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या कथित भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपासोबत युती करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ही भेट केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. विशेष बाबा म्हणजे, आमित शहा यांनी या भेटीचे वृत्त नाकारले नाहीये. अमित शहा यांनीदेखील, सर्वकाही जाहीर करायचं नसतं, असं सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता पुनः एकदा महाराष्ट्रातील भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा या भेटीविषयी चर्चाना उधाण आले आहे.  

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश, चकमकीत पाच नक्षलवादी ठार 

चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या कथित भेटीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पत्रकरांनी त्यांना भाजपा राष्ट्रवादीसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता, पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र एवढ्या रात्री का भेट घेतली याबाबत कोणतीही माहिती नाही. वरिष्ठांकडून अशा सूचना आल्या की त्या मानायच्या असतात.  तसेच, अद्याप मला कुठलेही  संकेत मिळालेले नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  तसेच, अशाप्रकारची भेट राजकीय आहे असे म्हणता येणार नाही. पण अशा भेटी होत असतात.  खरंतर याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात.  त्यामुळे अमित शाह व अध्यक्षांची भूमिका मान्य असेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

शरद पवार रुग्णालयात दाखल; 31 मार्चपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचा डॉक्टरांचा सल्ला  

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोलादेखील लगावला. अमित शाहांच्या बोलण्यावरून त्यांची भेट झाली असावी असे वाटते. पण ही भेट का झाली याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. पण या भेटीनंतर संजय राऊत यांना सरकार टिकेल, हे सांगावे लागते म्हणजे नक्कीच काही तरी गडबड आहे, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. 

संबंधित बातम्या