सव्वा महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

सायन हॉस्पिटलमध्ये उपचार; डॉक्‍टरांकडून टाळ्या वाजवत निरोप

मुंबई

याआधी मुंबईतील 80 वर्षीय वृद्धेने कोरोनाला हरवले होते. आता सव्वा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन हॉस्पिटल) कोरोनावरील उपचार घेणाऱ्या या चिमुकल्याच्या चाचणीचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले आणि डॉक्‍टरांनी टाळ्या वाजवत त्याला निरोप दिला.
सायन हॉस्पिटलमध्ये 19 मे रोजी या बाळाला दाखल करण्यात आले होते. फिट आणि ताप येत असल्यामुळे या बाळासह आईला दाखल करण्यात आले. काही दिवसांनी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या वेळी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारांनंतर बुधवारी त्याच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. कोव्हिड- 19 विषाणूच्या विरोधातील लढाई जिंकणाऱ्या या एक महिना सहा दिवसांच्या बाळाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. 
या चिमुकल्या कोरोनायोद्‌ध्याला लोकमान्य टिळक रुग्णालयातून डिस्चार्ज देताना डॉक्‍टरांनी टाळ्या वाजवत त्याला उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या बाळासह त्याच्या आईचे अभिनंदन केले.

टीका आणि यश
काही दिवसांपासून सायन हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांजवळच रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठवण्यात आली होती, परंतु काही दिवसांपूर्वी एका कोरोनाग्रस्त बाळावर याच रुग्णालयात मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सव्वा महिन्याचे बाळ कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे.

संबंधित बातम्या