वादळात छतासह पाळणा उडून बाळाचा मृत्यू
तासगाव तालुक्यात मतकुणकी-वासुंबे हद्दीवर हृदय पिळवटून टाकणारी घटना
तासगाव
तालुक्यातील मतकुणकी-वासुंबे गावाच्या हद्दीवरील नाईक वस्तीवर काळजाला चटका लावणारी घटना सोमवारी घडली. या वस्तीवर वादळ धडकलं आणि त्याने एका गरीब कुटुंबाचं होत्याचं नव्हतं केलं. वादळ इतकं जोरात घरात घुसलं, की घराचं छत उडून गेलं. त्यासोबत एक जीवही उडाला. तो जीव होता सहा महिन्यांच्या गोंडस मुलीचा. ती त्या घरातील आढ्याला बांधलेल्या पाळण्यात झोपली होती. वादळ घरात घुसतंय, हे ध्यानात आल्यावर तिची आई तिला पाळण्यातून काढायला धावली; मात्र तिच्या हाती तेवढा वेळच नव्हता. तिच्या डोळ्यांदेखत वादळानं सारं छत उचललं आणि पाळण्यासह बाळही उडून गेलं. साठ फुटांवर जाऊन ते छत खाली कोसळलं आणि डोळ्यांदेखत तिच्या निष्पाप लेकीचा बळी गेला.
तासगाव तालुक्यातील वासुंबे गावच्या संजय विश्वनाथ शिरतोडे यांच्या घरात ही दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. त्यांचे घर येते मतकुणकी हद्दीत. येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. घरात सगळे होते. पाळण्यात सहा महिन्यांची चिमुरडी राजनंदिनी खेळत होती. तिची आई नीता स्वयंपाक करायच्या गडबडीत होती. इतक्यात सातच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे घरात शिरले. सगळे पत्र्याचे छप्परच उचकटले आणि छप्पर आता उडणार, हे पाहताच राजनंदिनीला पाळण्यातून काढण्यासाठी आईने धाव घेतली. तोच क्षणार्धात पाळण्यासह छप्पर उडाले आणि काही अंतरावर जाऊन पडले. त्या शेडखाली पाळणा अडकून त्या चिमुरडीचा अंत झाला. हा प्रकार इतक्या क्षणार्धात घडला, की काही कळायच्या आत हे अघटित घडले.
दुर्दैवी राजनंदिनीचे आई-वडील दोघेही शेतमजुरी करतात. थोडीफार शेती आहे, तीही कोरडवाहू आहे. शिरतोडे दाम्पत्याला अन्य दोन जुळ्या मुली आहेत. कष्टानं या साऱ्या लेकींना मोठं करायचं, हे ठरवून कुटुंब काम करत होतं. त्या लेकींची आई नीता गरज पडली तर दुसऱ्याच्या शिवारात कामाला जात होती. सहा महिन्यांच्या लेकीला तिनं आढ्याला बांधलेल्या पाळण्यात ठेवलं आणि पाऊस यायच्या आत सारा पसारा आवरावा म्हणून ती कामाला लागली होती. पण तिच्या लेकीच्या भाळी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं.
वादळानं तिचा वेध घेतला. वादळं इतकं जोरात होतं, की साऱ्या कुटुंबाचा त्यानं विध्वंस करून टाकला. शिरतोडे कुटुंबाची लेक या वादळानं गिळली.
सांत्वन आणि मदतीच्या सूचना
आज सकाळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन शिरतोडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांना सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचना आमदार श्रीमती पाटील यांनी केल्या. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. उपसभापती डॉ. शुभांगी पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील, सरपंच नेताजी पाटील, माजी सरपंच बाळासाहेब एडके यांनीही भेट दिली.
आईचा टाहो
अवघ्या सहा महिन्यांच्या पोरीचा पत्रे आणि अँगलच्या ओझ्याखाली दबून मृत्यू झाला. अचानक हा प्रकार घडल्याने त्या दु:खातून तिचे आईवडील सावरले नाहीत. हा प्रकार समजताच आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्रे बाजूला काढून पाळणा बाहेर काढल्यावर राजनंदिनीच्या आईने टाहो फोडला.