मुंबईत पूर येण्यापूर्वीच त्याचे भाकीत वर्तविणे लवकरच होणार शक्य

It will soon be possible to predict floods in Mumbai
It will soon be possible to predict floods in Mumbai

मुंबई,

 मुंबईसाठी पुराचा इशारा देणाऱ्या अद्ययावत एकात्मिक अशा 'iFLOWS-मुंबई' या प्रणालीचा आज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रारंभ केला.

मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाच्या वेळी मुंबईतील पाणी वाढण्याविषयी म्हणजे पूरस्थितीविषयी पूर्वसूचना देऊन, बचावाच्या दृष्टीने शहराला अधिक समर्थ करणे, या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीचा वापर करून 3 दिवस आधी पुराचा अंदाज वर्तविणे आणि 3 ते 6 तासांपर्यंतच्या तत्कालीन अंदाजासह तसे भाकीत वर्तविणे शक्य होणार आहे.

विशेषकरून, सखल भागातुन लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज उत्पन्न होणार असल्यास, याचा निश्चित उपयोग होईल, कारण ,एखादा विशिष्ट भाग पाण्याखाली जाणार असल्याचा अंदाज आपणास 12 तास अगोदरच कळू शकेल. प्रत्येक लहान-लहान भागातील पावसाच्या प्रमाणाचाही अंदाज या प्रणालीमुळे कळू शकेल.

या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी, पूर-इशारा प्रणाली विकसित करणाऱ्या केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. "विज्ञानाबाबत आपण जगातील कोणाहीपेक्षा कणभरही मागे नाही" अशी अभिमानाची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. "मुंबईची पूरस्थिती- विशेषतः 2005 आणि 2017 मधील अवस्था सर्वांच्याच स्मरणात आहे.

आता ही अत्याधुनिक पूर-इशारा प्रणाली मात्र मुंबईकरांच्या मदतीला धावून येणार आहे." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "भूविज्ञान मंत्रालयानेच तयार केलेली अशाच प्रकारची प्रणाली चेन्नईमध्ये यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली आहे." असेही ते म्हणाले.

"भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली त्सुनामीसाठीची पूर्वसूचना प्रणाली ही संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट अशी आहे, आणि तिने याबाबत कधीही चुकीचा धोक्याचा इशारा दिलेला नाही" असे प्रतिपादनही डॉ.हर्षवर्धन यांनी केले.

हिंदी महासागर क्षेत्रातील अन्य देशांपर्यंत या प्रणालीची सेवा विस्तारित करण्यात आली असून, त्यांना याचा मोठा फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.  

'भूविज्ञान मंत्रालयाने विकसित केलेली ही अद्ययावत अशी पूर-इशारा प्रणाली म्हणजे मुंबईकरांसाठी एक अनोखी भेट असल्याची' भावना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे उभे राहिलेले आरोग्यसंकट आणि नुकत्याच येऊन गेलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रक्त-व्यवस्थापन आणि पूर-व्यवस्थापन दोन्हीना सारखेच महत्त्व आहे, असेही ते म्हणाले.

राज्यात निसर्ग चक्रीवादळाचे आणि मोसमी पावसाचे अचूक भाकीत वर्तविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भूविज्ञान मंत्रालयाचे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

हवामानशास्त्र विभागाने निसर्ग चक्रीवादळाचा अगोदरच अंदाज दिल्याने, आपत्तीचा आणखी मोठा फटका बसण्यापासून आणि आणखी जीवितहानी होण्यापासून राज्याला वाचविणे राज्य सरकारला शक्य झाले, असेही ते म्हणाले. 

"मुंबईसाठी 160 पेक्षा जास्त वेधशाळा आणि (पुढच्या पावसाळ्यापर्यंत उपयोगात येणारे असे) आणखी 4 रडार- ऑर्डर केले असून यामुळे दर 500 मीटर अंतरापर्यंत व दर 15 मिनिटांसाठी पावसाचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे", अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम.राजीवन यांनी यावेळी दिली.

'आयफ्लोज मुंबई' या पूर-इशारा प्रणालीचे काम वेळेवर पूर्ण करता आल्याबद्दल राजीवन यांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.इकबालसिंग चहल म्हणाले की, "आयफ़्लोज मुंबई' हे पूर्ण देशासमोरचे आदर्श उदाहरण ठरेल." भूविज्ञान मंत्रालयाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करून, "ही प्रणाली मोसमी पावसाचे मुंबईत आगमन होण्याच्या आधी अगदी वेळेवर सुरु होत आहे" अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी, मुंबई पूर-इशारा प्रणालीची एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली आणि या प्रणालीबाबतचे एक डिजिटल माहितीपत्रकही प्रकाशित करण्यात आले. भारतीय हवामानशाश्त्र विभागाच्या मुंबई क्षेत्राचे उप-महासंचालक श्री. के.एस.होसाळीकर हेही यावेळी उपस्थित होते.

 ही अंदाज-प्रणाली कशी काम करते ? 

भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ही अत्याधुनिक प्रणाली तयार केली आहे. पावसाच्या परिमाणाची आकडेवारी तसेच, मुंबई मनपाने पुरविलेली अन्य स्थानिक माहिती- जसे की- भूमी-उपयोजनाची आकडेवारी, जमिनीचे चढ-उतार, जलनिस्सारण प्रणाली, शहरातील जलस्त्रोत, भरतीची पातळी, पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या, इत्यादी.

या सर्व माहितीचा वापर करून ही प्रणाली हवामान, पर्जन्यमान, पाणी वाहून जाण्याचे प्रमाण, पाण्याची हालचाल, भरती आणि वादळी स्थितीमुळे होणारी वाढ व तिचा प्रभाव या सर्वांबद्दलचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार करते, व त्या आधारे अंदाज व्यक्त करते.

पावसामुळे येणारी पूरस्थिती, नदीकाठांच्या वरून पाणी वाहणे, वादळाचा प्रभाव, रस्त्यामुळे तसेच इमारती, रेल्वेमार्ग, यामुळे प्रवाहात निर्माण होणारा अडथळा, भरती आणि सागरजलपातळीत वाढ- अशा सर्व मुद्द्यांचा या प्रणालीत विचार केलेला आहे. 

आयफ्लोज प्रणालीमध्ये सात भाग आहेत. यापैकी, माहिती संकलन भागात हवामानविभागाच्या अंदाजांसह विविध प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात गोळा  केली जाते. यात मुंबईतील नद्या आणि सरोवरांच्या खोलीबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे.

पूरस्थिती भागात ही सर्व माहिती, पुराची 3 दिवस अगोदर माहिती देण्यासाठी वापरली जाईल. तर शहरातील विविध क्षेत्रातून पाण्याची हालचाल कशी होईल याबद्दल प्रणालीचा पूर भाग माहिती देईल.

प्रणालीच्या धोकाविषयक भागांची मिळून निर्णय-आधार-व्यवस्था बनलेली आहे. यामुळे पूरस्थिती पाहून झटपट व शास्त्रशुद्ध निर्णय घेण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. प्रणालीतील वितरण भागामुळे प्रत्यक्ष क्षेत्रातील अधिकाऱ्यांना संपर्कयंत्रणेद्वारे सर्व माहिती पोहोचविण्याची सोय होते. यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात तत्पर कार्यवाही करणे शक्य होते.

याने आकार कसा घेतला?

महाराष्ट्राची राजधानी मुंबई, हे देशातील एक प्रमुख महानगर आणि भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर. शहराला नैसर्गिक आणि वादळी स्थितीतील जलनिस्सारण यंत्रणा लाभलेली असूनही वारंवार येणाऱ्या पूरस्थितीमुळे शहर ठप्प होण्याचे संकट अनेकदा ओढवते.

या पूरप्रवण शहरातील बचावयंत्रणेला पूरक ठरण्यासाठी मुंबईसाठी एकात्मिक पूर-इशारा प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने,चेन्नईतील अशाच प्रकारचे प्रतिमान डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाशी संपर्क साधला. सदर मंत्रालयाने जुलै-2019 मध्ये कामास सुरुवात केली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com