जूनमध्येही दुकानदारांचा धंदा मंदच

Dainik Gomantak
मंगळवार, 23 जून 2020

मॉल-शॉपिंग सेंटर खुले करण्याची मागणी

मुंबई

सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यावरही देशभरातील लहानमोठ्या दुकानदारांचा व्यवसाय अजूनही थंडच आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत त्यांना मोठा तोटा झाल्याचे दिसून आले आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने देशात सर्वत्र सर्वच मॉल-शॉपिंग सेंटर खुले करावेत, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. 
सुमारे सत्तर दिवसांच्या लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने जून महिन्यात बिगर अत्यावश्‍यक बाबींची दुकाने, मॉल-शॉपिंग सेंटर उघडण्यास संमती दिली. तरीही वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसारच त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे दिल्लीसारख्या राज्यात मॉल-शॉपिंग सेंटर उघडली, तरी महाराष्ट्रात ती बंदच आहेत. मात्र जिथे ही अन्य दुकाने उघडली आहेत, तेथेही येण्यास ग्राहक घाबरत असल्याने या दुकानदारांचा व्यवसाय घटला आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने नुकत्याच केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. 
एक ते पंधरा जूनदरम्यान देशातील लहान-मोठी दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर यांचा व्यवसाय कसा झाला, याबाबत असोसिएशनने पाहणी केली. गेल्या जूनच्या तुलनेत या जूनमध्ये मॉलच्या व्यवसायात 77 टक्के, तर मोठ्या दुकानांच्या धंद्यात 61 टक्के घट झाली. रेस्टोरंटमध्ये येणारे खवय्ये 70 टक्के कमी झाले; तर कपडेविक्री 69 टक्‍क्‍यांनी कमी झाली. दागिने, घड्याळे आदी वैयक्तिक वापराच्या बाबींचा खपही 65 टक्के कमी झाला. 
दरम्यान फर्निचर, अन्नधान्य-वाणसामान, ग्राहकोपयोगी वस्तू यांचा धंदा थोडाथोडा सावरतो आहे. या वस्तू विकणाऱ्या मोठ्या दुकानांच्या व्यवसायात 14 टक्के वाढ झाली; पण याच वस्तू विकणाऱ्या छोट्या दुकानांचा व्यवसाय 33 टक्के कमी झाल्याचे निरीक्षणही असोसिएशनने नोंदवले आहे. पश्‍चिम भारतातील मॉलचा सरासरी व्यवसाय 74 टक्के कमी झाला; तर उत्तर भारतात हेच प्रमाण 71 टक्के होते. पूर्व आणि दक्षिण भागातील मॉलच्या व्यवसायात अनुक्रमे 63 व 59 टक्के घट नोंदवली गेली. 

एकसारखे नियम नाहीत
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक ते सर्व उपाय दुकानदार योजत आहेत. मात्र देशभरात सर्वत्र दुकाने उघडण्यासाठी एकसारखे नियम नाहीत. त्यामुळे सरकारने सर्वत्र सर्व दुकाने, मॉल आदींना व्यवसायाची संमती द्यावी, असे असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या