महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटकने बेळगावचे नाव बदलले. आणि त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत, विवादित भागाला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करणार असल्याचे वक्तव्य आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला कर्नाटक राज्यात सामील करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पत्रकारांशी बोलताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचे बोलत आहेत. आणि यासाठी ते मराठी भाषिक लोकांचा आधार घेत आहेत. मात्र मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, अशी मागणी लक्ष्मण सवदी यांनी यावेळेस केली. तसेच बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा चॅप्टर लवकरच क्लोज करणार असल्याचे विधान लक्ष्मण सवदी यांनी केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल
लक्ष्मण सवदी यांनी मुंबई बाबत बोलताना, मुंबई हा प्रांत पूर्वी कर्नाटकात असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर भाषावार प्रांतरचना झाल्यावर तो महाराष्ट्रात गेला. आणि बेळगाव कर्नाटक मध्ये आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुढे बोलताना, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगाव, निपाणी परिसरातील मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बंद, हरताळ करून हा भाग महाराष्ट्रात देण्याची मागणी करत असतात. पण अद्याप न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे मराठी भाषिकांच्या तर्कानुसार मुंबई भागातील कन्नड नागरिकांवरही आपला हक्क असल्याचे सांगत मुंबई कर्नाटक मध्ये सामील करण्याची मागणी लक्ष्मण सवदी यांनी केली. याव्यतिरिक्त मुंबई कर्नाटक मध्ये सामील होत नाही तोपर्यंत, मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करतो, असे ते म्हणाले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी, बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना भाजपात घेऊन सीमाप्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. आणि टप्प्याटप्प्याने ही प्रकिया करून महाराष्ट्र एकीकरण समिती मोडीत काढणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असल्याचा दावा देखील लक्ष्मण सवदी यांनी यावेळेस केला.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट असूनही कर्नाटक सरकारने जाणूनबुजून बेळगावच्या वादग्रस्त भागाचे नाव बदलले असल्याचे म्हटले होते. तसेच वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून गेली कित्येक वर्षे अन्यायाची वागणूक मिळत आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत विवादित भागाला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.