कोळीवाडा खरोखरच कोरोनामुक्त झाला का?

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

वरळी कोळीवाड्यातील नगरसेविकेलाच या आठवड्यात कोरोनाची बाधा झाली आहे. असे असताना एखादा विभाग कोरोनामुक्त झाल्याचे कसे निश्‍चित होऊ शकते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मुंबई

वरळी कोळीवाडा परिसरात गेल्या आठवडाभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे महिनाभरानंतर या परिसरावरील निर्बंध उठवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच कोळीवाडा कोरोनामुक्त झाल्याचा दावाही केला जात आहे; मात्र मुंबईत आतापर्यंत 70 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच आढळली नाहीत आणि केवळ लक्षणे असलेल्या संशयितांचीच तपासणी पालिकेतर्फे केली जात आहे. तसेच वरळी कोळीवाड्यातील नगरसेविकेलाच या आठवड्यात कोरोनाची बाधा झाली आहे. असे असताना एखादा विभाग कोरोनामुक्त झाल्याचे कसे निश्‍चित होऊ शकते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
ठराविक दिवसांत रुग्ण न आढळल्यास प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथिल केल्या जातात. वरळी कोळीवाड्यातही याच निकषानुसार निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. या भागातील नगरसेविका या शेवटच्या कोरोना रुग्ण आहेत. त्यानंतर कोरोनाची साखळी संपली. नगरसेविकेच्या कुटुंबाला क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. निर्बंध शिथिल केले असले तरी या भागातील नियमित तपासणी आणि ज्येष्ठ नागरिकांची ऑक्‍सीमिटरच्या साह्याने होणारी तपासणी सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ आहेच, त्याचबरोबर हा शिवसेनेचा पारंपरिक गडही आहे. त्यामुळे वरळीतील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होत होत्या. 29 एप्रिल रोजी कोळीवाड्यात चार कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने तातडीने 45 हजारांची वस्ती असलेले गाव सील केले. कोळीवाड्याबरोबर शेजारच्या जिजामात नगर आणि जनता कॉलनीतही रुग्ण आढळल्याने हा परिसरही सील करण्यात आला. या वरळी पॅटर्नची स्तुती केंद्रीय पथकानेही केली; पण आजही शहरातील सर्वांत जास्त रुग्णांची नोंद वरळी प्रभादेवीच्या जी दक्षिण प्रभागात झाली आहे. महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्रभागनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी देणे बंद केल्यामुळे रुग्णांची निश्‍चित संख्या मिळू शकली नाही. आतापर्यंत वरळी कोळीवाड्यात 90 च्या आसपास रुग्ण आढळले; तर 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

निष्कर्ष काढणे घाईचे
महापालिकेच्या म्हणण्यानुसार गेल्या सात दिवसांत कोळीवाडा, आदर्श नगर, जनता कॉलनी येथे एकही रुग्ण आढळला नाही; मात्र केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत केवळ कोरोनाची लक्षणे असलेल्या संशयितांचीच तपासणी केली जात आहे. त्यामुळे एकही ताप, सर्दी खोकल्याचा रुग्ण नाही म्हणजे कोरोनामुक्ती असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते.

भाजपचा आक्षेप
वरळी कोळीवाडा परिसरात गेल्या आठवडाभरात एकही रुग्ण आढळला नाही. या भूमिकेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. कोळीवाड्यात याच आठवड्यात एका नगरसेविकेला कोरोना झाला आहे. मग ठरविक दिवसांत रुग्ण आढळला नाही, असा दावा कसा करतात, असा सवाल भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी वरळी परिसरात गरजूंना दिल्या जाणाऱ्या तांदळाच्या दर्जावरही प्रश्‍न निर्माण केला आहे. या भागातील रेशनच्या दुकानांवर निकृष्ट दर्जाचे धान्य विकले जात असल्याचा आरोप करत त्यांनी वरळी पॅटर्नबद्दलच प्रश्‍न उपस्थित केला आहे.

... यापुढे संपूर्ण वस्तीऐवजी चाळच सील?
वरळी कोळीवाडा पॅटर्न शिवसेनेसाठी आता अडचणीचा ठरू लागला आहे. या परिसरातील 700 अतिजोखमीच्या व्यक्तींना पालिकेने सार्वजनिक केंद्रात क्वॉरंटाई केले आहे; मात्र महिनाभरापेक्षा अधिक काळ 70 ते 80 हजार नागरिकांना प्रतिबंधित करून ठेवणे अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे आता संपूर्ण वस्ती सील करण्याऐवजी ज्या घरात रुग्ण आढळेल, तीच चाळ सील करण्याचा पर्याय पालिकेकडून स्वीकारला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या