लाखो उत्तरपत्रिका तपासणीविना पडून

Dainik Gomantak
शनिवार, 13 जून 2020

पेपर जमा करण्यासाठी विशेष मोहीम

मुंबई

कोरोना महामारीचा मोठा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीला बसला आहे. मुंबई विभागीय मंडळातील लाखो उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नाहीत. आतापर्यंत पेपर तपासणीचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे; तर मुंबईतील शेकडो पेपर तपासनिसांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका अद्याप मंडळाकडे जमा केलेल्या नाहीत. हे पेपर जमा करून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगवे यांनी सांगितले.
मुंबई आणि उपनगरांत 60 टक्‍क्‍यांहून अधिक मॉडरेटर राहतात. लॉकडाऊनमुळे मुंबई विभागात दहावीच्या 84 टक्के आणि बारावीच्या 80 टक्के उत्तरपत्रिका तपासून जमा झाल्या आहेत. मुंबई आणि उपनगरांतून उत्तरपत्रिका जमा करण्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे मुंबई शिक्षण मंडळाचे अधिकारी 15 आणि 16 जूनला वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जाऊन संबंधित मॉडरेटरकडून उत्तरपत्रिका जमा करणार असल्याचे सांगवे यांनी सांगितले. त्यासाठी मॉडरेटर आणि शाळांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबई विभागीय मंडळात दहावी आणि बारावीचे आठ लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुमारे 42 लाख उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्या आहेत. दहावीच्या एकूण 2346 मॉडरेटरपैकी 1984 जणांनी पेपर जमा केले आहेत. बारावीच्या 1642 मॉडरेटरपैकी 1203 जणांनी उत्तरपत्रिका जमा केल्या आहेत. मुंबईत कोरोनाचे संकट गंभीर असल्याने उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडथळे आले. आता राज्य सरकारने अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट केल्याने पेपर तपासणीचे काम वेगाने होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

इतिहासामुळे निकाल लांबणीवर?
मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने लॉकडाऊनच्या दोन दिवस अगोदर घेण्यात आलेल्या इतिहासाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण मंडळाने या उत्तरपत्रिका शाळांमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली, परंतु इतिहासाच्या पेपर तपासणीचे काम रखडल्यामुळे दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

 

संबंधित बातम्या