दारू अत्यावश्‍यक वस्तू नाही

अवित बगळे
शुक्रवार, 24 जुलै 2020

सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट; तूर्तास विक्री ऑनलाईनच

मुंबई

लॉकडाऊनमध्ये दुकानांमधून दारूविक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या विक्रेत्यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. दारू ही अत्यावश्‍यक वस्तू नाही, असेही न्यायालयाने सुनावले आहे. त्यामुळे तूर्तास तरी दुकानांमध्ये थेट दारू विक्री होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात मुंबईसह अनेक महापालिकांनी ऑनलाईन दारूविक्रीस परवानगी दिली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका पाहता प्रत्यक्ष दुकानात जाऊन दारू विकत घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र दारू व्यापारी संघटनेने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने महापालिकेकडे दाद मागा, असे सुचविले होते. त्यामुळे संघटनेने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठापुढे यावर आज सुनावणी झाली.
मुंबई महापालिकेकडे थेट दारू विक्रीबाबत निवेदन दिले आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑनलाईन दारू विक्री करणे अडचणीचे होत आहे, असे याचिकादारांकडून ऍड. चरणजीत चंदरपाल यांनी सांगितले. महापालिकेला निर्णय घेण्यासाठी अवधी निश्‍चित करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दारू ही काही अत्यावश्‍यक वस्तू नाही. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट करत याचिका नामंजूर केली.

परवानगी महापालिकाच देणार
मुंबई महापालिकेने दिलेल्या ऑनलाईन दारू विक्रीच्या निर्णयाला संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात प्रथम आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने महापालिका स्थानिक परिस्थितीनुसार धोरणात्मक निर्णय घेत असते. सध्याच्या साथीच्या परिस्थितीत अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेकडे दाद मागा, असे उच्च न्यायालयाने सुचविले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या