62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

चार दिवसांत वाटप; राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती

मुंबई

राज्यात 15 मेपासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या चार दिवसांत 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिली. 15 मे रोजी 5,434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. 16 मे रोजी 8,268 ग्राहकांना, 17 मे रोजी 20,485 ग्राहकांना आणि 18 मे 2020 रोजी 28,729 ग्राहकांना घरपोच मद्य पुरवण्यात आले.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी 5,221 मद्याची दुकाने सुरू आहेत. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत; मात्र संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रणालीतील अडचणी दूर करण्यात येत आहेत. तोपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक किंवा दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात मद्यप्रेमींना ऑफलाईन मद्य परवाने देण्याची सोय करण्यात आली आहे.
एक वर्षाकरिता 100 रुपये; तर आजीवन परवान्याकरिता 1 हजार रुपयांमध्ये मद्य परवाना काढता येणार आहे. त्यामुळे मद्य विक्री दुकानांसमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

संबंधित बातम्या