राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंच्या नावाबाबत राज्यपालांच्या निर्णयाची उत्सुकता

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

मागील सहा महिन्यांपासून वादाचा आणि राजकीय उत्सुकतेचा  विषय ठरलेली विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची नावे महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे आज सुपूर्द केली आहेत. 

मुंबई : मागील सहा महिन्यांपासून वादाचा आणि राजकीय उत्सुकतेचा  विषय ठरलेली विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची नावे महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे आज सुपूर्द केली आहेत. 

भाजपमध्ये बंडाचा झेंडा रोवत राष्ट्रवादीची वाट धरणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादीकडून करण्यात आली असून शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि नितीन बानगुडे- पाटील यांच्या  नावांची शिफारस करण्यात आली आहे.  राज्यपालांनी नियुक्त करायच्या जागांचे निकष लक्षात घेऊनच ही १२ नावे निश्चित करण्यात आली आहेत. 

महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केली आहेत. ती नावे त्यांनी आज राज्यपालांना बंद लिफाफ्यातून सादर केली. कायद्यातील सर्व तरतुदींचा अभ्यास करून ही यादी तयार केली असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. राजभवनातील सूत्रांनी या संबंधात कोणतेही विधान केलेले नाही मात्र महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांना भेटण्यास आल्याचे छायाचित्र पाठविण्यात आले आहे. यादी सादर केल्यावर अभ्यास करण्यास वेळ मागण्याचा  अधिकार राज्यपालांना  आहे. आज अनिल परब (शिवसेना) नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉंग्रेस ) आणि अमित देशमुख (कॉंग्रेस )यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहेत उमेदवार 
शिवसेना : उर्मिला मातोंडकर, नितीन, बानगुडे पाटील,चंद्रकांत रघुवंशी आणि आनंद करंजकर, कॉंग्रेस : रजनीताई पाटील, मुजफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि अनिरुद्ध वनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस : एकनाथ खडसे , आनंद शिंदे, यशपाल भिंगे आणि राजू शेट्टी

संबंधित बातम्या