तिजोरी गुजरात, राजस्थानच्या हातात

Dainik Gomantak
रविवार, 7 जून 2020

यंत्रमागाची संकटात खडखड सुरू; तयार कापड गुदामात

गोकूळ खैरनार 
मालेगाव

 कोरोनाला अंगाखांद्यावर घेत महाराष्ट्राचे मॅचेस्टर असलेल्या मालेगावात पुन्हा यंत्रमागाचा खडखडाट वेगाने सुरू होत आहे. हा खडखडाट सुखावणारा असला तरी येथे कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसिंग युनिट नाहीत. येथील 70 टक्के यंत्रमाग धारकांना त्यासाठी गुजरात व राजस्थानवर अवलंबून रहावे लागते. नेमके या राज्यातील युनिट पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याने मालेगावात तयार होणारे बहुतांशी कापड गुदामात पडून आहेत. दोन्ही राज्यातील युनिट सुरू न झाल्यास येथील यंत्रमाग व्यवसायावर मोठे संकट येऊ शकते. सध्या तरी मालेगावच्या आर्थिक चाब्या गुजरात, राजस्थानच्याच हातात आहेत.

ऐन सिजनमध्ये लॉकडाऊन
कोरोनामुळे येथील यंत्रमाग अडीच महिने बंद होता. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत हिंदू- मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होतात. यंदा या कालावधीतच रमजान ईदचा सण होता. ऐन व्यवसायाच्या कालावधीतच लॉकडाउन झाल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला. बंद असलेले यंत्रमाग, साईझींग व प्रक्रिया उद्योग सुरू करताना अडचणी येत आहेत. यातून मार्ग काढत हा उद्योग पुन्हा उभारी घेऊ पाहतोय.

रोज तयार होते दीड व दोन कोटी मीटर कापड
मालेगावातील दोन लाखावरील सर्व यंत्रमाग 24 तास सुरू राहिले तर रोज जवळपास दीड ते दोन कोटी मीटर कापड तयार होते. प्रतिदिन 50 ते 55 ट्रक कापडाच्या गाठी प्रोसेसिंगसाठी गुजरातमधील सुरत, अहमदाबाद राजस्थानातील पाली, बोलोत्रा, जेधपूर व नवी मुंबईतील प्रोसेसिंग युनिटमध्ये जातात. तेथे कापड रंगीत केले जाते. एका ट्रकमध्ये 200 गाठी बसतात. दोन हजार मीटर कापडाची एक गाठ बनविली जाते. प्रक्रिया केल्यानंतर हे कापड थेट बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली व कोलकत्ता येथील बाजारात जाते. मालेगावचे 75 टक्के कापड परराज्यातील बाजारात विकले जाते. उर्वरित कापड महाराष्ट्रातील स्थानिक बाजारात इतर कापडांना टक्कर देत तग धरून राहते. सध्या येथे जवळपास निम्मे यंत्रमाग सुरू झाले आहेत. हे प्रमाण दिवसागणित वाढणार आहे.

प्रोसेसिंग युनिट सुरू होणे गरजेचे
मालेगावातील यंत्रमाग सुरू होणे जेवढे गरजेचे आहे. तेवढ्याच प्रमाणात परराज्यातील प्रक्रिया उद्योग सुरू होण्याची आवश्‍यकता आहे. सुरत, अहमदाबाद व नवी मुंबईतील युनिट कोरोनामुळे पूर्णपणे बंद आहेत. पाली येथील 20 टक्के तर बालोत्रा व जेधपूर येथील प्रत्येकी 40 टक्के युनिट सुरू झाले आहेत. या भागातील बिहार व यूपीतील कामगार गावी परतल्याने मजुरांची टंचाई जाणवत आहे. युनिट मालक कामगार पुन्हा परतण्याची वाट पहात आहेत. अशा परिस्थितीत मालेगावात तयार होत असलेल्या कापडापैकी केवळ 30 ते 40 टक्के कापडावरच प्रक्रिया होत आहे. बाकीचे कापड प्रक्रियेच्या प्रतीक्षेत गुदामात आहे. येथे आजपासून आणखी यंत्रमाग सुरू होत आहेत. त्यामुळे उत्पादन वाढणार आहे. अशा परिस्थितीत गुजरात, राजस्थान मधील प्रक्रिया उद्योग सुरू होणे तसेच बिहार, उत्तरप्रदेश, कोलकत्ता व दिल्लीतील कापड बाजार पूर्णपणे सुरू होणे मालेगावच्या हिताचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या