लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीच्या वडिलांवर चाकूहल्ला

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

करण जाधव (रा.रूम नं.303, शिव कृपा बिल्डिंग, लौजी, ता. खालापूर) याचे वासरंग येथे राहणाऱ्या मुलीसोबत गेले तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते.

खालापूर

प्रेयसीच्या वडिलांनी जावई करून घेण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांवर चाकूहल्ला केल्याची घटना खालापूर तालुक्‍यातील वासरंग मस्को गेट येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, करण जाधव (रा.रूम नं.303, शिव कृपा बिल्डिंग, लौजी, ता. खालापूर) याचे वासरंग येथे राहणाऱ्या मुलीसोबत गेले तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. मुलीच्या घरी प्रेम प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर करण याने लग्नासाठी मागणी घातली होती; परंतु मुलीच्या वडिलांना हे मान्य नसल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने सोमवारी (ता.8)
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रेयसीच्या घरासमोर येऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रेयसीचा भाऊ त्याला समजावण्यास गेला असता करणने त्यालादेखील शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाला सोडविण्यास गेलेल्या वडिलांवर करणने चाकूने वार केला.
या घटनेनंतर आरोपी करण जाधवने घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत मुलीच्या वडिलांनी खोपोली पोलिस ठाण्यात करण विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोईर करीत आहेत.

 

 

संबंधित बातम्या