१९ तास ढिगाऱ्याखाली राहून सुद्धा तो वाचला; पण १३ जणांचा जीव गेला

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

ढिगाऱ्याखाली अडकलेला चार वर्षांचा मुलगा आश्‍चर्यकारकरित्या वाचला आहे. गेल्या २७ तासांपासून तेथील मदतकार्य अविरत सुरू आहे.

महाड: महाड शहरातील ‘तारिक गार्डन’ ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेला चार वर्षांचा मुलगा आश्‍चर्यकारकरित्या वाचला आहे. गेल्या २७ तासांपासून तेथील मदतकार्य अविरत सुरू आहे. दरम्यान, राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे .

मदतकार्य करताना दुपारी पहिला मृतदेह हाती लागला. त्यानंतर एकूण तेरा जणांचे मृतदेह मिळाले. ढिगाऱ्याखाली आणखी सहा जण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘तारिक गार्डन’ ही २००९मध्ये बांधलेली पाच मजली इमारत निकृष्ट बांधकामामुळे काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका होत्या. तर एक जिम, एक कार्यालय आणि एक मोकळा हॉल होता. ‘ए विंग’ मध्ये २१ सदनिकांमध्ये ५४ जण राहत होते,  यातील ४१ जण सुखरूप बाहेर पडले. तर १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले. ‘बी विंग’ मध्ये २० सदनिका होत्या, यातील ४३ जणांपैकी ३७ सुखरूप बाहेर पडले तर ६ जण अडकले. महंमद बांगी हा चार वर्षांचा मुलगा या दुर्घटनेतून आश्‍चर्यकाररित्या बचावला आहे.

पाच जणांवर गुन्हा दाखल
या दुर्घटनेप्रकरणी ‘तारिक गार्डन’ इमारतीचे विकसक फारुख महमुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स, तळोजा, नवी मुंबई ), वास्तुविशारद गौरव शहा (व्हर्टीकल आर्किटेक्ट ॲण्ड कन्सल्टंसी, नवी मुंबई ), आर सी सी डिझायनर बाहुबली टी. धावणे (श्रावणी कन्सल्टन्सी मुंबई ), महाड नगर पालिकेचे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे आणि तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झुंजाड यांच्यावर महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या