महाराष्ट्रातील 80 लाख पालक ऍन्ड्राईड मोबाइलविना

Dainik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

विद्यार्थ्यांसाठी मागितला दूरदर्शन, आकाशवाणीचा वेळ: स्मरणपत्रानंतरही पंतप्रधानांकडून उत्तर नाही

सोलापूर

पहिली ते बारावीपर्यंतच्या राज्यातील दोन कोटी मुलांपैकी तब्बल 80 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍन्ड्राईड मोबाइल नसल्याचे शिक्षण विभागाच्या सर्व्हेत समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन काळात 100 टक्‍के विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे, यासाठी केंद्र सरकारने दूरदर्शनवरील आठ चॅनल व आकाशवाणीचा वेळ द्यावा, असे स्मरणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
सततचा दुष्काळ अन्‌ नापिकी, शेतमालास हमीभाव नाही यासह अन्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत नेटर्वकचा नेहमी प्रोब्लेम येतो. तर हातावरील पोट असलेल्या पालकांकडे साधे मोबाइल आहेत, तर बहूतांश पालकांकडे मोबाईलच नाहीत. त्यामुळे अशा गडचिरोली, वर्धा, भंडारा, अकोला, सोलापूर, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये मुलांमधील शिक्षणाची गोडी वाढविणे, त्यांना शालेय प्रवाहाबाहेर जाऊ न देण्याचे आव्हान, शिक्षण विभागापुढे उभे राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन टिचिंगसाठी केंद्राने दूरदर्शन व आकाशवाणी उपलब्ध करुन द्यावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्‍त केली. तत्पूर्वी, 15 जूनपासून व्हॉट्‌सअपद्वारे ननवी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.

ठळक बाबी...
- दोन कोटींपैकी 60 टक्‍केच मुलांच्या पालकांकडेच आहेत ऍन्ड्राईड मोबाइल
- राज्यातील 95 टक्‍के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली शालेय पुस्तके: दहावी-बारावीच्याच अभ्यासक्रमाला कात्री
- प्रतिबंधित क्षेत्रातील शिक्षकांना लागली वेतनाची चिंता : ऑनलाइन टिचिंगच्या प्रवाहापासून दूर असलेल्यांच्या वेतनाबाबतही प्रश्‍नचिन्ह
- केंद्र सरकारकडून दूरदर्शवरील काही चॅनेल व आकाशवाणीचा वेळ उपलब्ध व्हावा: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना अपेक्षा
- खासगी शाळांकडून ऑनलाइन टिचिंगसाठी वेगळे शुल्क: शालेय फीसंदर्भात राज्यातील पालकांकडून तक्रारींचा ढिगारा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. दोन कोटींपैकी सुमारे 40 टक्‍के मुलांच्या पालकांकडे ऍन्ड्राइड मोबाइल नसल्याने त्यांच्यापर्यंत सहजासहजी शिक्षण पोहचावे म्हणून दूरदर्शन व आकाशवाणीची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधानांना दोनवेळा पत्रव्यवहार करुनही काहीच उत्तर आलेले नाही.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

संबंधित बातम्या