'तुम्ही महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही?'

udhhav thakre
udhhav thakre

 मुंबई- महाराष्ट्रात तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का नाही, असा जोरदार हल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांना परवानगी नसल्याने मुंबईच्या सावरकर स्मारक भवनात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच दसरा मेळावा असून यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यांत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला.

‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. आज सर्वत्र महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. विधानसभेत मी म्हटले होते की इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता.  आम्हाला हिंदुत्वाबद्दल कोण विचारतंय? बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात जो हाहाकार माजला होता त्यावेळी असे विचारण्याची कोणाची हिंमत नव्हती. आता जे आम्हाला हिंदुत्वावर प्रश्न विचारत आहेत, ते त्यावेळी शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते, याबद्दल काहीही कल्पना नाही. कदाचित त्यावेळी ज्यांचे नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हते. आता ते आम्हाला विचारत आहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले, तुम्ही अचानक सेक्युलर कसे झालात, अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 

शिवसेनाप्रमुख आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक असल्याची टीका केली जाते. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व नको. त्यांनी आम्हाला हे हिंदुत्व शिकवले. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरे येते काय? मला अतिरेक्यांना बडवणारे हिंदुत्व हवे आहे. कोरोना आल्यावर थाळ्या आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नाही. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारे हे कसले हिंदुत्व. आमचे हिंदुत्व असे नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा अर्थ यावेळी विशद केला.
 
हिंदुत्व आमचे राष्ट्रीयत्व आहे. आज रा. स्व. संघाच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषणात हिंदुत्वाबद्दल भाष्य केले. त्यांना मानणारे आणि त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत. त्या टोपीखाली जर डोक असेल तर सरसंघचालकांच्या वाक्याचा त्यांनी विचार करावा आणि त्यांच्याकडून हिंदुत्व समजून घ्यावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com