मराठी भाषकांच्या भावनेचा आदर करावा....

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मणगुत्ती येथे बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटविण्यात आला. त्यामुळे तेथील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

बेळगाव: सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करावा, अशी सूचना महाराष्ट्र सरकारने कर्नाटकाला करावी. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मणगुत्ती आणि पिरनवाडी येथे घडलेल्या प्रकरणानंतर मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे शनिवारी (ता. 5) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सीमाप्रश्नी नेमण्यात आलेले समन्वयकमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ यांना पत्र पाठविण्यात आले आहे. मणगुत्ती येथे बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटविण्यात आला. त्यामुळे तेथील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातच काही दिवसापूर्वी पिरनवाडी येथे ग्रामस्थांनी जागा विकत घेऊन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारला. मराठी लोकांनी कधीही संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यास विरोध केलेला नाही. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या जागेत पुतळा उभारावा, अशी मागणी पिरणवाडी ग्रामस्थांची होती. मात्र जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले आहे. असे प्रकार करुन दिवसेंदिवस सीमाभागातील मराठी लोकांना त्रास देण्याचा प्रकार होत घडत आहे.

२००४ पासून सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा लढा प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करावा, अशी स्पष्ट ताकीद कर्नाटक सरकारला करावी, अशी विनंती पत्रात केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या