कोकणातील मच्छिमारांसाठी महाराष्ट्र शासनाने 65 कोटी रुपयांचे पॅकेज

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

क्‍यार आणि महाचक्रीवादळाचा तडाखा बसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कोकणातील मच्छीमारांना राज्याने आज ६५ कोटी १७ लाख २० हजारांच्या पॅकेजची घोषणा केली.

सावंतवाडी: क्‍यार आणि महाचक्रीवादळाचा तडाखा बसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कोकणातील मच्छीमारांना राज्याने आज ६५ कोटी १७ लाख २० हजारांच्या पॅकेजची घोषणा केली. यातून सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली.

राज्याच्या सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात १३ हजार ८३८ यांत्रिकी मासेमारी नौका व एक हजार ५६४ बिगर यांत्रिकी नौका आहेत. याशिवाय, सिंधुदुर्गात ९६ रापणकर संघ आहेत. यंदा समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना मासेमारीचा कालावधी अत्यंत कमी मिळाला. यात अरबी समुद्रात निर्माण झालेले क्‍यार आणि महाचक्रीवादळाचा कालावधीही समाविष्ट आहे. यातून छोट्या मच्छीमारांना खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. २०१९-२० या मासेमारी हंगामात पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. याचा विचार करून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मच्छीमारांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पॅकेजची घोषणा करण्यात आली. 

या आधी २००८ मध्ये ३१ कोटी ६५ लाख २६ हजारांचे पॅकेज देण्यात आले होते. याच धर्तीवर मच्छीमारांना झालेल्या नुकसानीपोटी ६५ कोटी १७ लाख २० हजारांचे पॅकेज जाहीर करण्यात आले.

संबंधित बातम्या