नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र सरकारची कर्ज काढण्याची तयारी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

राज्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर मदत व पुनवर्सन विभागाने जुलै- ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल पाठवा, असे पत्र विभागीय आयुक्‍तांना दिले होते. ​

सोलापूर - राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या जिल्ह्यांना परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपले. त्यानंतर राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल आल्यावर मदतीची घोषणा केली जाणार आहे. किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज घेऊन राज्य सरकार तेवढे कर्ज काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा होणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

यासंदर्भातील काही महत्वपूर्ण बाबी-  

  •     नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन माहिती ऑनलाइन भरण्याचे प्रशासनाला आदेश 
  •     पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाईची निश्‍चित होणार रक्‍कम 
  •     राज्य सरकार नुकसानग्रस्तांना करणार तातडीची मदत; केंद्रालाही पाठविला जाणार मदतीचा प्रस्ताव 
  •     नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर भरपाईसाठी राज्य सरकार काढणार कर्ज 
  •     नुकसानग्रस्तांच्या मदतीचे निकष बदलणे, प्रथम किती भरपाई द्यायची, किती कर्ज काढावे लागेल, यावर आज चर्चा 

राज्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर मदत व पुनवर्सन विभागाने जुलै- ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल पाठवा, असे पत्र विभागीय आयुक्‍तांना दिले होते. मात्र, कोरोनामुळे त्यावेळी पंचनामे होऊ शकले नाहीत. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमधील एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच राज्यात पुन्हा परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे आता सर्वच पंचनामे एकत्रित करुन नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिले आहेत. त्यानुसार युध्दपातळीवर कार्यवाही सुरु झाली असून पुढील आठवड्यात संपूर्ण अहवाल राज्य सरकारला सादर होईल. नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्‍कम निश्‍चित करुन तेवढे कर्ज काढले जाईल, अशी माहिती मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

   

संबंधित बातम्या