राज्य सरकारकडून कोरेगाव- भीमा प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

तत्कालीन फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उसळलेल्या कोरेगाव - भीमा दंगल प्रकरणाची राज्य सरकारच्या वतीने विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होण्याचे संकेत आहेत. 

मुंबई: तत्कालीन फडणवीस सरकारच्या कार्यकाळात उसळलेल्या कोरेगाव - भीमा दंगल प्रकरणाची राज्य सरकारच्या वतीने विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होण्याचे संकेत आहेत. 

कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अगोदरच महाराष्ट्र सरकारला एसआयटी चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्रातील माहितीच्या आधारे तत्कालीन मुख्यमंत्री व विदर्भातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील अशी चर्चा होती. मात्र शरद पवार यांच्या पत्रानंतर तातडीने केंद्र सरकारने भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाचा  तपास महाराष्ट्र सरकार कडून काढून घेत तो एनआयए या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील संस्थेकडे घेतला होता. यावरून महाविकास आघाडी सरकार व भारतीय जनता पक्षात राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले होते. 

शरद पवार यांनी आज याबाबत बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसने या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली. या प्रकरणी एक आठवड्यात गृहमंत्री अनिल देशमुख आणि नितीन राऊत याबाबत चर्चा करतील आणि पुढची भूमिका ठरवतील, असे या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड तसेच,  गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, अमिताभ गुप्ता हे उपस्थित होते. कोरेगाव - भीमाबाबत शरद पवार म्हणाले, ‘‘गेले अनेक दिवस आम्ही अस्वस्थ आहोत, नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जाते, हे योग्य नाही. आज या प्रकरणाचा आढावा घेतला . या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयए करत आहे, त्यांच्या तपासाला धक्का न लावता राज्य सरकारलाही तपास करण्याचे काही अधिकार आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या