Sachin Vaze Case: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी नेमली समिती  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 30 मार्च 2021

मुंबईत घडलेल्या पोलीसनाट्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापल्याचे पाहायला मिळते आहे.

मुंबईत घडलेल्या पोलीसनाट्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापल्याचे पाहायला मिळते आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या लेटरबॉम्ब नंतर या घटनेवरून संसदेच्या अधिवेशनात देखील गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने या प्रकरणासंबंधित मोठा निर्णय घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. आणि त्यानुसार आता महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय समिती गठीत केली असल्याची माहिती मिळाली आहे. (Maharashtra Government sets up a high-level committee to probe allegations levelled on Home Minister Anil Deshmukh)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. त्यानंतर या कारचे कथित मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. तर याप्रकरणाचे धागेदोरे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यापर्यंत पोहोचल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले होते. यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश दिल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोप प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय समिती गठीत केली असल्याची माहिती महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मिळाली आहे.

सचिन वाझेप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई 

याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा कालावधी सहा महिन्यांचा राहणार आहे. ही समिती 6 महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. दरम्यान, अनिल देशमुख यांनी स्वतःहून चौकशीच्या मागणीचे पत्र सोशल मीडियाच्या ट्विटरवरून शेअर केले होते. परमबीर सिंग यांनी आपल्यावर जे आरोप केले आहेत, त्या बद्दल चौकशी करून, दूध का दूध आणि पानी का पानी करावे, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली होती. शिवाय, मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली तर, आपण त्याचे स्वागत करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विट मध्ये पुढे लिहिले होते. तसेच या ट्विटच्या शेवटी त्यांनी सत्यमेव जयते, असेही नमूद केले होते.        

संबंधित बातम्या