संजय राऊत, देवेंद्र फडणवीसांत दोन तास खलबते

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

 शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी तब्बल दोन तास चर्चा केली. यानिमित्ताने चर्चेला उधाण आले आहे

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी तब्बल दोन तास चर्चा केली. यानिमित्ताने चर्चेला उधाण आले आहे. भाजपने मात्र ‘सामना’च्या मुलाखतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असे सांगितले.   संजय राऊतांनी मात्र अशी भेट झालीच नसल्याचे  सांगितले शिवसेनेने मात्र यावर सूचक मौन बाळगले आहे.  गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत प्रचंड घडामोडी सुरू आहेत. त्यातच आज ही भेट घडली. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सामना दैनिकात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत यावी, अशी इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. ही मुलाखत अनकट छापून यावी असे फडणवीस यांचे मत आहे.

त्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. बिहार निवडणुकीनंतर ही मुलाखत छापून येईल, असेही त्यांनी नमूद केले.शिवसेनेने विशेषतः संजय राऊत यांनी या गुप्त बैठकीचा प्रथमत: इन्कार केला नंतर त्यांच्याशी मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

भेटीचे मला माहीत नाही : पाटील 
फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडण्याच्या हालचालींना प्रारंभ झाल्याच्या वृत्ताचा  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इन्कार केला. 

ही भेट झाली का हे मला माहीत नाही. राजकारणात भेटी होत असतात, पण आम्ही गेल्या नऊ महिन्यांत कधीही हे सरकार पाडू, असे विधान केलेले नाही.

 ते अंतर्विरोधामुळे पडेल, असे आम्ही म्हणतो आहोत, असे  पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या