लोणार सरोवर आता आंतरराष्ट्रीय पाणथळ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची आंतरराष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होणार आहे.

नागपूर :  उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची आंतरराष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होणार आहे. कारण खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या या सरोवराला ‘आंतरराष्ट्रीय पाणथळ’ हा दर्जा मिळाला आहे. ‘रामसर’ या संकेतस्थळावर लोणार सरोवर झळकले आहे. 

पाणथळ जागांमध्ये  जैवविविधतेचा विकास आणि संवर्धनाचे कार्य सुरू असते. मात्र, जगातील अनेक पाणथळांचा व्यावसायिक उपयोग केला जातो अथवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाप्रकारचे  नैसर्गिक पाणवठे हे विविध जिवजंतूचे संरक्षक आणि उत्पादक परिसंस्था म्हणून ओळखले जातात. तलाव, खारफुटी वने, नद्या, दलदल, प्रवाळ बेटे आणि सरोवरे पाणथळ म्हणून ओळखले जातात. नैसर्गिक ठिकाणांबरोबरच कृत्रिम मिठागरे आणि भातशेतीसुद्धा पाणथळच असते. यावर्षी दख्खनच्या पठारावर असलेले बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि उत्तर प्रदेशातील किथम या मानवनिर्मित तलाव या दोन ठिकाणांची ‘रामसर’ मध्ये समावेशासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हे दोन्ही पाणथळ आता  ‘रामसर’ च्या संकेतस्थळावर झळकली आहेत. यामुळे लोणार सरोवराला असलेली आंतरराष्ट्रीय ओळख आणखी भक्‍कम होईल. बरोबरच जगभरातील पर्यटक आणि निसर्गप्रेमींची पावले लोणारकडे वळतील. ‘रामसर’ च्या यादीत आता भारतातील एकूण ४१ पाणथळ जागांचा समावेश झाला आहे. लोणार सरोवराच्या विकासासाठी आता सरकारला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

संबंधित बातम्या