मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे पुन्हा येणार एकाच मंचावर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे हे 23 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी एकाच मंचावर येणार आहेत.

कुडाळ :  पक्ष सहकारी ते राजकीय प्रतिस्पर्धी अशी पार्श्वभूमी असलेले प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे हे 23 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे बऱ्याच वर्षांनी दोघं एकत्र दिसणार आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या 23 जानेवारीली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी उद्घाटन 26  जानेवारीला रोजी करण्यात येणार होतं . मात्र शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे 23 जानेवारीला करण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर टाकणाऱ्या चिपी विमानतळाची उभारणी पूर्ण झाली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत विमानसेवेचा प्रारंभ होईल.  बहुतांश कामे पूर्णत्वाला गेली असून केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. आता कोणताही अडथळा नाही, असे पालकमंत्री उदय सामंतांनी काल सांगितले.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी  अधिकाऱ्यांसमवेत चिपी विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत श्री. सामंत म्हणाले, ‘‘चिपी विमानतळाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करू, या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक माणसाला कशी सुरक्षितता मिळेल, या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. येथे रस्ता सुशोभीकरणाबरोबर विमान येताना घ्यावयाची काळजी, पोलिस किती, सुरक्षा यंत्रणा किती सज्ज आदींबाबतचे नियोजन झाले आहे. केंद्र सरकारच्या आवश्‍यक परवानग्या घेण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राने कोणत्याही प्रकारचे आडमुठे धोरण घेतलेले नाही. सांघिक प्रयत्नातून येत्या आठ ते दहा दिवसांत सिंधुदुर्ग विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे.’’

खासदार राऊत म्हणाले, ‘‘विमानतळाची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. उडान योजनेअंतर्गत चिपी ते मुंबई प्रवास आता प्रत्येकी अडीच हजार रुपयांमध्ये करता येईल. इतर कंपन्या हवाई वाहतूक करायला इच्छुक आहेत. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. चिपीचे विमानतळ इतरांना भुरळ घालेल, अशा स्वरूपाचे असणार आहे. हवाईमंत्री हरदीपसिंग पुरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र पातळीवर संपर्क सुरू आहे. १०० टक्‍के केंद्राचे सहकार्य मिळणार आहे.

पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून राज्याने आपले काम पूर्ण केलेले आहेत. २० लाख लिटर पाणी, ११ केव्ही वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. रस्ता प्रस्तावाबाबत आमदार केसरकर व आमदार नाईक यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याची डागडुजी सुरू आहे. नामकरणाबाबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व बॅरिस्टर नाथ पै यांची नावे केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत. यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल. 

संबंधित बातम्या