अखेर उंदराने डोळे कुरतडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

अखेर उंदराने डोळे कुरतडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू!
Rajawadi Municipal Hospital

मुंबई: राजावाडी येथील मनपा रुग्णालयातील आयसीयूमध्ये एका व्यक्तीवर उपचार सुरु असताना बेशुद्धावस्थेत रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची गंभीर घटना मंगळवारी समोर आली होती. मात्र बुधवारी रात्री नऊ वाजता 24 वर्षीय श्रीनिवास यल्लपा यांचा मृत्यू झाला. श्रीनिवास यांना मेंदूज्वर झाला होता आणि त्याचे यकृतही खराब झाले होते म्हणून ते या रूग्णालयात उपचारासाठी आले होते.( Man bitten by rat in ICU dies in Rajawadi Municipal Hospital)

श्रीनिवास यलप्पा यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्रास असह्य झाल्यानंतर त्यांना रविवारी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या टेस्ट केल्यानंतर लक्षात आले की त्यांना मेंदूज्वर झाला आहे. तसेच त्यांचे यकृतही खराब झाल्याचे टेस्टमधून समोर आले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मंगळवारी सकाळी श्रीनिवास यांच्या डोळ्यातून रक्त यायला लागले. आणि ते त्यांच्या नातेवाईकांना दिसले. नातेवाईकांनी त्यांचे डोळे निरखून पाहिले असता श्रीनिवासच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे दिसून आले.

हा सगळा प्रकार समजल्यानंतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सला जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून उद्धट उत्तरे मिळाल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. हा सगळा प्रकार परिसरात सर्वत्र समजल्यानंतर राजावाडी येथील मनपा रुग्णालयातील प्रशासनावर सडकून टीका करण्यात आली. या गंभीर घटनेनंतर रूग्णालयातील इतर रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

श्रीनिवास यांच्या डोळ्यांना मंगळवारी उंदराने कुरतडल्याने मोठी जखम झाली होती. आणि काल बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com