मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने या सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणावर 5 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे.

मुंबई :  मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने या सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणावर 5 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. यामध्ये न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. राज्याच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संवोदनशील असल्याने ही सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यापूर्वीची सुनावणी ही 9 डिसेंबरला घेण्यात आली होती.  मराठा आरक्षण उपसमितीने एक आठवड्यापूर्वी दिल्लीत बैठक घेत आपल्या पुढील धोरणांबाबत चर्चा केली होती. मराठा आरक्षण या गंभीर विषयापासून केंद्र सरकारने अलिप्त राहू नये, आरक्षणाचा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून इतर राज्यांमधील आरक्षणावर याचा होणारा परिणाम पाहता केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं होतं.

देशभरातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी व्हावी, या मागणीसाठी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान कायदेतज्ज्ञांशी झालेल्या चर्चेतून ही सूचना पुढे आली होती. 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात 5 दिवस आधीच म्हणजे आज मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु, न्यायालयाने या सुनावणीला आज स्थगिती दिली असून, आता या प्रकरणावर 5 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या