सिंघुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

उद्धव ठाकरे; शिवसेना-कोकण हे तर पार्टनर

ओरोस

कोकण शिवसेनेचा पार्टनर आहे. दोघेही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी राहिले आहेत. आता सरकार म्हणून आम्ही कोकणच्या पाठीशी आहोत. त्यामुळे सिंधुदुर्गची मेडिकल कॉलेजची मागणी मान्य करूच. त्याचबरोबर जिल्ह्यात आरोग्याच्या आवश्‍यक सुविधा उभारण्यासाठी लागणारे प्रस्ताव सादर करा. या मागण्या मी, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री पूर्ण करू, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
सिंधुदुर्गनगरीत उभारलेल्या माकडताप तपासणी इमारतीमध्ये कोविड 19 लॅबचा प्रारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून रिमोटद्वारे केला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""ही लॅब सुरू करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी हातभार लावला आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. कोकणवर माझे विशेष प्रेम आहे. येथील गडकिल्ले, हिरवाई कोणालाही प्रेमात पाडणारे आहेत. त्यामुळे येथील विकास करताना कोकण आहे तसेच राहिले पाहिजे. प्रदूषण नको.'' ते म्हणाले, ""यापूर्वी कुठल्याही भाषणाची सुरुवात मी बाळासाहेब यांच्याप्रमाणे "जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो', अशी करीत असतो. आता कोरोनामुळे सर्व विखुरलेले असल्याने तसे बोलता येत नाही.''
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ""रायगड, रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना लॅब झाल्याने हे तिन्ही जिल्हे स्वतःच्या पायावर उभे झाले आहेत. ही लॅब प्रामुख्याने माकडतापासाठीची आहे. आता येथे माकडताप, कॅन्सरसह कोरोनाची तपासणी, तसेच अन्य साथीच्या रोगांचे निदान होणार आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चिकित्सक पद्धतीमुळे सिंधुदुर्गात कोरोना प्रादुर्भाव रोखता आला आहे. कोरोना आला तेव्हा राज्यात दोनच लॅब होत्या. सिंधुदुर्गातील लॅब सुरू झाल्याने आज आम्ही शंभरी गाठली आहे. सिंधुदुर्गात नेहमीच उच्च शिक्षण व आरोग्य विभागातील पदे रिक्त राहिली आहेत; पण सर्व रिक्त पदे भरली जातील.''
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ""राज्य शासनाची कृपादृष्टी नेहमीच कोकणावर राहिली आहे. त्यामुळेच कोरोना लॅब सुरू होऊ शकली. लॅब होणार की नाही, यावरून राजकारण पेटले होते. त्याला आपण तिलांजली दिली, त्याबद्दल आभार.''

मेडिकल कॉलेजसाठी खासदारांचे साकडे
शिवसेना स्थापना दिनाच्या मुख्यमंत्री ठाकरे यांना शुभेच्छा देऊन खासदार विनायक राऊत म्हणाले, ""निवडणूक काळात दिलेली आश्‍वासने पूर्ण करीत आहात. दोन्ही जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास आपण प्रयत्न करीत आहात. तुमच्या गतिमान कारभारामुळे आमच्या जिल्ह्याचे प्रशासन सुद्धा गतिमान झाले आहे. आता या जिल्ह्याला मेडिकल महाविद्यालयाची गरज आहे. ती मागणी पूर्ण करा.''
 

संबंधित बातम्या