आणि राज्यपाल कोश्यारी म्हणाले..महाराष्ट्राच्या 'राज'चे आज दर्शन झाले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

वाढीव वीज बिलांसंदर्भात सरकारने तात्काळ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले.

मुंबई- वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यात वाढीव वीज बिलांसंदर्भात सरकारने तात्काळ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केले. राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्यात या निमित्ताने काही खुमखुमीत चर्चाही झाल्याचे कळते.   

'एबीपी माझा'ने वृत्तानुसार, राज ठाकरे राज भवनात आल्यावर राज्यपालांनी त्यांची १ वर्षापासून वाट पाहत असल्याचे बोलून दाखवले. महाराष्ट्राच्या 'राज'चे आज आम्हाला दर्शन झाले. असेही राज्यपाल यावेळी म्हणाले. यानंतर राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे वीज शुल्क कमी करण्याची मागणी करत याबाबत निवेदन दिले. 

कित्येक दिवसांपासून आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना जाऊन भेटलो. त्यांच्या बैठका घेतल्या, प्रसंगी  आंदोलनेही केली. मात्र, त्यानंतरही सरकारने या प्रश्नाकडे कानाडोळाच केला. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार   सरकारने बैठका घेऊन सगळे ठरवले आहे. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादीच्या या दोन पक्षांमधील श्रेयवादामुळे नागरिकांना न्याय मिळत नाही आहे. त्यात आणखीन हे खाते काँग्रेसकडे असल्याने तीनही पक्षांमधे चर्चा नाही. नागरिकांना या प्रश्नी न्याय मिळावा म्हणून राज्यपालांना भेटलो असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या