मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर ॲमेझॉन नरमली

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

 ॲमेझॉनने  आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिली.

मुंबई, ता. २६ : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केलेल्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन कंपनी अखेर नरमली आहे. या कंपनीने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिली. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचा दावाही  चित्रे यांनी केला आहे.

‘अॅमेझॉनकडून काही वेळातच मराठीची घोषणा, श्रेय सर्व धडाकेबाज महाराष्ट्र सैनिकांचे, अभिनंदन’ असे ट्विट करून चित्रे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मनसेने मराठी भाषेच्या ॲपसाठी फ्लिपकार्ड आणि अॅमेझॉन या कंपन्यांना इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर फ्लिपकार्डने आपल्या ॲपमध्ये मराठीचा पर्याय सुरू केला; मात्र ॲमेझॉनने मनसेला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे मनसैनिकांनी या कंपनीच्या कार्यालयात खळ्ळखट्याक सुरू केले होते. ‘‘राज ठाकरे, आमचे सचिव, पदाधिकारी यांना नोटीस पाठवल्यानंतर माफी मागावी, अशी पहिली अट आम्ही कंपनीला घातली होती. त्यानुसार त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ५ जानेवारीला सर्व केस रद्द करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.’’ असेही चित्रे यांनी सांगितले.

ठाकरेंना नोटीस

मनसेच्या मोहिमेविरोधात ॲमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी दिंडोशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील ॲमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली होती.

संबंधित बातम्या