कोव्हिडला रोखणार मोनोक्‍लोनल अँटीबॉडीज 

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020


औषध तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा; पेटंट मिळाल्यानंतर घोषणा 

मुंबई

कोरोनावर औषध सापडण्यास काही काळ जाईल, असे सांगितले जात असताना जगभरात संशोधनावर भर दिला आहे. इस्त्राईलने कोरोनाच्या विरोधात मोनोक्‍लोनल अँटीबॉडीज तयार केल्याचा दावा केला आहे. त्याचे पेंटट मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतरच औषधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांनी दिली. 
इस्त्राईलने कोरोनाच्या विरोधात मोनोक्‍लोनल अँटीबॉडीज तयार केल्याचा दावा केला आहे. मोनोक्‍लोनल अँटीबॉडीज तंत्र म्हणजे शरीरात जनुकीयदृष्ट्या एकाच प्रकारच्या अँटीबॉडीजच्या प्रती निर्माण करणे, असे डॉ. रंजन गर्गे यांनी सांगितले. एखादा विषाणू मानवी शरीरात संक्रमित झाल्यावर रोग प्रतिकारकशक्ती अँटीबॉडीज तयार करते. अशा प्रकारच्या अँटीबॉडीज प्रयोगशाळेत वाढवून रुग्णाला टोचणे, असे हे तंत्र आहे.
कोणत्याही पेशींची प्रजनन क्षमता अमर्याद असते. म्हणून उंदरातील बी लिम्फोसाईट आणि कॅन्सरची पेशी यांच्या मिलनातून प्रयोगशाळेत तिसऱ्या प्रकारच्या पेशी तयार केल्या जातात. यांना हायब्रिडोमा असे म्हणतात. हायब्रिडोमा पेशीमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता तर असतेच, पण त्यांना अमर्याद जननक्षमताही प्राप्त होते. अशा हायब्रिडोमा पेशी रोग्याच्या शरीरात पाहिजे तेवढ्या मात्रेत टोचल्या जातात. या इंग्रजी वाय (Y) आकाराच्या अँटीबॉडीज विषाणूच्या पृष्ठभागावरील स्पाईक प्रथिनाला चिकटतात आणि त्याला फुप्फुसाच्या पेशीत प्रवेश करण्यास मज्जाव करतात. परिणामी संक्रमण रोखले जाते. 

उंदरावर प्रयोग
उंदराच्या शरीरात विषाणू सोडल्यावर त्याच्या रक्तात लिम्फोसाईट पेशी तयार होतात. त्यापासूनच पुढे अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज म्हणजे इम्युनो ग्लोब्युलिन प्रथिने असतात. उंदराच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीज रुग्णाला टोचल्या जातात; परंतु ते व्यवहार्य नाही. कारण, अँटीबॉडीज मिळवण्यासाठी असे किती उंदीर मारणार, असा प्रश्‍न केला जातो. 

कोरोना प्रतिबंधावरील प्रत्येक संशोधन वैश्‍विक असणार आहे. प्रत्येक देशातील सूक्ष्मजीव संशोधक कामाला लागले आहेत. त्याचा फायदा प्रत्येक देशाला होणार आहे.
- डॉ. रंजन गर्गे, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ.

संबंधित बातम्या