मुंबईत दीडशे कोटींच्या नालेसफाईला चुना?

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

3 लाख 62 हजार मेट्रिक टन गाळाबाबत प्रश्‍नचिन्ह

मुंबई

पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे; मात्र पहिल्याच पावसाने पोलखोल केली. नाले गाळाने तुडुंब भरल्याचे दिसून आले. नालेसफाईच्या कामाला कंत्राटदारांनी चुना लावल्याचे बिंग पावसाने फोडले. या कामासाठी 150 कोटी रुपये पालिकेने खर्च केले आहेत. नाल्यातून काढलेला तीन लाख 62 हजार मेट्रिक टन गाळ कुठे टाकला, असा सवाल आता विरोधक करू लागले आहेत.
मुंबईतील नालेसफाईच्या कामांना एप्रिलमध्ये सुरुवात व्हायला हवी होती; मात्र मार्च महिन्यातच कोरोनामुळे मुंबई लॉकडाऊन झाली आणि नालेसफाई रखडली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना परवानगी देण्यात आली. परप्रांतातील मजूर गावी गेल्याने अपुरे मजूर घेऊन कंत्राटदारांनी नालेसफाईची कामे सुरू केली. पालिकेचे जे अभियंते ही अभियांत्रिकी कामे करतात त्यांना मजूर आणि बेघरांना जेवणाची पाकिटे वाटण्यासाठी नेमले होते. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर देखरेख कोणाचीही नव्हती. कंत्राटदारांना मोकळे रान होते. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचा निकाल पहिल्याच पावसाने दाखवून दिला. त्यामुळे नालेसफाईच्या कामांचा फार्स उघड झाल्याची टीका होऊ लागली आहे.
प्रत्यक्ष 25 टक्के नालेसफाई झाल्याची टीका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. आता मुंबईतील नालेसफाईबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. नालेसफाईच्या कामांकडे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाल्याने यंदा मुंबईत पूरपरिस्थिती उद्‌भवण्याचा धोका आहे.

मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी यंदा 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. नाल्यांमधील तीन लाख 62 हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. मग हा गाळ गेला कुठे? कुठे टाकला?
- रवी राजा, विरोधी पक्षनेते

संबंधित बातम्या