मुंबई पोलिसांची मोफत कोरोना चाचणी

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

औरंगाबादेतील साई धाम फाऊंडेशनचा पुढाकार

मुंबई

कोरोना संकटात आपले कर्तव्य पार पाडत असताना मुंबईत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला; तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या मदतीसाठी औरंगाबादमधील डॉक्‍टरांचे पथक धावून आले असून त्यांच्याकडून मुंबई पोलिसांची मोफत कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
राज्यभर साधारणत: 1200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून 76 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. पोलिसांना कोरोना संकटातून वाचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी व कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला औरंगाबादच्या साई धाम फाऊंडेशनने प्रतिसाद देत 1 जुलैपासून पोलिसांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी साई धाम फाऊंडेशनकडून 15 डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक बनवण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येत असून ज्या पोलिसांना कोरोना सदृश्‍य लक्षणे आहेत त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

रोज 300 पोलिसांची तपासणी
मुंबईत 94 पोलिस ठाणी असून 55 हजारपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. पोलिस मुख्यालयातून आलेल्या यादीप्रमाणे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दिवसाला साधारणत: 3 पोलिस ठाण्यांतील 300 कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाते. आतापर्यंत 47 पोलिस ठाण्यातील 5 हजार पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यातील 50 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली.

कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत तपासणी
पुढील महिनाभरात मुंबईतील पोलिस ठाण्यातील पोलिसांची तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय मुंबई विमानतळावर कार्यरत सीआयएसएफ जवानांचीही आरोग्य तपासणी व कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत गरजेनुसार पुढेही तपासणी सुरू ठेवणार असल्याचे साई धाम फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.

कोरोना संकटात सर्व फ्रंटलाईन वॉरियर जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशा योद्‌ध्यांच्या सोबत राहणे आपले कर्तव्य आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केल्यानंतर आम्ही सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत आम्ही ही सेवा देणार आहोत.
- डॉ. सुमनजी, अध्यक्ष, साई धाम फाऊंडेशन.

संबंधित बातम्या