साताऱ्यात भरदिवसा पोलिस ठाण्यात खून

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

प्रेयसीच्या वादातून प्रकार; पोलिसांसमोरच कोयत्याने केले सपासप वार, संशयितही जखमी

सातारा

प्रेयसीच्या वादातून आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता सातारा तालुका पोलिस ठाण्यातच एकाला कोयत्याने उभा चिरून खून करण्यात आला. या हाणामारीत हल्ला करणारा संशयितही जखमी झाला आहे. सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा. सैदापूर) असे मृताच नाव आहे. तर रामचंद्र ऊर्फ रामा तुकाराम दुबळे (वय 40, रा. मतकर कॉलनी) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. पोलिस ठाण्यामध्येच खून होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामा दुबळे याची सैदापूरमध्ये सासुरवाडी आहे. त्याच वस्तीत सुरेश कांबळे हा कुटुंबासह राहतो. रामाचे दोन विवाह झाले आहेत. सध्या त्याचे दुसऱ्या एका मुलीबरोबर फिरणे चालू होते. त्या मुलीचा सुरेशच्या मुलीशी वाद झाला होता. त्याबाबत त्या मुलीने रामाला माहिती दिली. त्यानंतर रामाने सुरेश कांबळेच्या मुलीला शिवीगाळ व मारहाण केली. तीन दिवसांपूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दाखल तक्रारीनुसार आज दोघांनाही सातारा तालुका पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सुरेश हा आधीच पोलिस ठाण्यात आला होता. त्याने सोबत कोयता आणला असल्याची माहिती कोणालाही नव्हती. थोड्या वेळाने रामा दुबळेही तेथे आला. तो पोलिस ठाण्यात आल्या-आल्याच सुरेशने रामावर कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. झटापट करत-करत दोघे पोलिस ठाण्याच्या बाहेर आले. या झटापटीत सुरेशच्या हातातून कोयता निसटून खाली पडला. तीच संधी साधत रामाने तो कोयता उचलला आणि सुरेशच्या डोक्‍यात, हातावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात रक्ताचा सडाच पडला होता.
ही हाणामारी सोडावायलाही कोणी धजावणार नाही, अशी परिस्थीती होती. त्यातूनही काहींनी पुढे सरसावून दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. गंभीर वार व रक्तस्त्रावामुळे सुरेश तेथेच खाली कोसळला. रामाच्या शरीरातूनही रक्त वाहत होते. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच सुरेशचा मृत्यू झाला होता. रामावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार रमेश शिखरे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख तपास करत आहेत.

"एसपीं'सह वरिष्ठांची घटनास्थळी धाव
सातारा तालुका पोलिस ठाण्यात झालेल्या या थरारक प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी तातडीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन पाहणी केली. या वरिष्ठांनी तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
 

संबंधित बातम्या