महाराष्ट्र पोलिसांनी अर्णव गोस्वामींविरूद्ध केलेल्या कारवाईचे अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांकडून समर्थन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

"आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे. त्यासाठी आम्ही वाट पाहणार आहोत,’’ अशा शब्दांत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

आम्हाला न्याय मिळेल!

मुंबई, ता. ४ :  ‘‘अर्णव गोस्वामी यांच्या कंपनीकडून केलेल्या कामाचे पैसे मिळाले असते तर आज माझे पती जिवंत असते. माझ्या पतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णव गोस्वामीसह तीन जणांची नावे लिहिली होती. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. महाराष्ट्र पोलिसांनी आज केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे. त्यासाठी आम्ही वाट पाहणार आहोत,’’ अशा शब्दांत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘अर्णव गोस्वामी यांच्या एआरजी आउटलायर या कंपनीचा मुंबईतील स्टुडिओ उभारण्याचे काम माझ्या पतीने केले होते. या कामाचे ८३ लाख रुपये त्यांनी थकविले. तुला पैसे मिळणार तर नाहीच, पण जे मिळाले तेही मी वसूल करतो, अशी धमकी देत अर्णवने इतर देणेकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आमच्याविरोधात भडकवले’, असा आरोप अक्षता नाईक यांनी केला. आम्हाला राजकारण करायचे नाही आहे. पण, माणूस म्हणून आम्हाला पाठिंबा द्या. आम्ही पंतप्रधानांपासून अनेकांना ई-मेल पाठवून न्याय मागितला, असेही त्या म्हणाल्या. ‘‘पैशांवरून अर्णवकडून सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. मुलीचे करिअर उद्‍ध्वस्त करण्याची अर्णवने धमकी दिली होती. दुसरी कामे घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे वडिलांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, ’’असे नाईक यांची मुलगी अज्ञा नाईकने सांगितले.

संबंधित बातम्या