कोरोना रुग्णांची नावे गोपनीयच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

केंद्राच्या निर्णयात हस्तक्षेपास न्यायालयाचा नकार

मुंबई

कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्यास केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वांद्वारे मनाई केली आहे. या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला.
कोरोनाची साथ वाढत असल्याने सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णांची नावे जाहीर करावी, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका ऍड. यशोदीप देशमुख यांनी केल्या होत्या. वैष्णवी घोळवे या विधी विद्यार्थिनीने आणि महेश गाडेकर या शेतकऱ्याने ही याचिका केली होती. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुरक्षा तत्त्वांमध्ये कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्यास मनाई आहे. याची नोंद घेत त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आणि याचिका निकाली काढली.
राज्य सरकारने नावे जाहीर करण्याच्या याचिकेला विरोध केला होता. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रभागाकडून त्यावर छाननी सुरू होते आणि कार्यवाही केली जाते, असे त्यांनी सांगितले. राज्यातील संख्या वाढत आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या अधिक आहे. त्यापैकी किती पॉझिटिव्ह आहेत, याबाबत अभ्यासात्मक अहवाल आवश्‍यक आहे, असे खंडपीठाने याचिकादारांना सांगितले. यानंतर याचिकादारांनी याचिका मागे घेतली.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या