सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण: ‘एनसीबी’चा तपास आता रियाचा भाऊ शौविकभोवती

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

फैयाज अहमद नावाच्या तरुणाला ‘एनसीबी’ने मंगळवारी (ता.१) गोव्यातून अटक केली. त्याचे गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यशी असलेल्या संबंधाबाबत एनसीबी तपास करत आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आज सेलिब्रिटींना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा एनसीबीचा तपास आता रियाचा भाऊ शौविकभोवती फिरत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

फैयाज अहमद नावाच्या तरुणाला ‘एनसीबी’ने मंगळवारी (ता.१) गोव्यातून अटक केली. त्याचे गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यशी असलेल्या संबंधाबाबत एनसीबी तपास करत आहे. फैयाज गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये चालक म्हणून काम करतो. तसेच तो मुंबई आणि कर्नाटकमध्ये अमली पदार्थ वितरित करत होता. त्याचप्रमाणे फैयाजकडून बंगळूरमधील एका श्रीमंत व्यक्तीला अमली पदार्थ पुरवायचा. ही व्यक्ती पेज-थ्री पार्ट्यांमधील महत्त्वाची व्यक्ती आहे. फैयाजचे सातत्याने मुंबई, कर्नाटक येथे येणे-जाणे होते.  

मुंबईतील कारवाईत अटक केलेल्या वितरकांचेही वांद्रे परिसरात जाळे होते. त्याचे धागेदोरे शौविकपर्यंत पोहचले आहे का, याबाबतही एनसीबी तपास करत आहे. जैद आणि बशीद या दोन संशयितांकडून सध्या एनसीबी अधिक माहिती घेत आहे. संशयित जैद हा मुंबईतील एक मोठा अमली पदार्थांचा तस्कर असून त्याची चौकशी या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जैदने १७ मार्चला दिलेल्या अमली पदार्थांचा संबंध सुशांतसिंह प्रकरणाशी जुळत आहे. याप्रकरणी एनसीबीने आज पहाटे बशीद परिहार नावाच्या एका २० वर्षीय तरुणालाही ताब्यात घेतले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या