'शरद पवारांपासून पंतप्रधानपद कसे आणि कोणामुळे  लांब गेले हे मी पाहिले आहे'

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 12 डिसेंबर 2020

शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांचे दोनदा पंतप्रधानपद हुकल्याची खंत व्यक्त केली.

मुंबई- 1991च्या लोकसभा निवडणुकीत बहुमताजवळ गेल्यानंतरही पवारांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यासाठी नरसिंह राव यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यांच्यापासून पंतप्रधानपद कसे आणि कोणामुळे  लांब गेले हे मी पाहिले आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी पवार यांचे दोनदा पंतप्रधानपद हुकल्याची खंतही व्यक्त केली.

राजीव यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस बहुमताजवळ असताना पंतप्रधानपदी शरद पवार यांना निवडले जावे असा एक मतप्रवाह होता. मात्र, 'दिल्ली दरबारी' पवारांना रोखण्यासाठी अनेक कट कारस्थाने सुरू होती. निवडणुकांच्या आधी पवार नको म्हणून नरसिंह राव यांना पवार यांच्या विरोधात अध्यक्षपदी बसवण्यात आले. निवडणुकांनंतरही सोनिया गांधी यांच्या नावाचा वापर, गैरवापर करून पंतप्रधानपदीही नरसिंह यांनाच काँग्रेसने पसंती दिली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण हे महत्वाचे खाते देऊन त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यांचे पंतप्रधानपद कसे आणि कोणामुळे दूर गेले हे मी पाहिले आहे, असे पटेल यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. 

नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतरही शरद पवार त्यांचे प्रतिस्पर्धी असल्याने राव यांच्या मनात त्यांच्याविषयी कायमच अढी होती. पवार यांचे पक्षातील महत्व कसे कमी करायचे याच विचारात असताना मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलींची कारणे देत पवार यांना महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधाकरराव नाईक यांना हटवायचेच असल्याने पवार यांना मोठेपणा देत असल्याता बहाणा बनवत त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घ्यायला लावली. महाराष्ट्रातील परिस्थिती बघून पवारांनीही त्यावेळी महाराष्टात परतण्याचा निर्णय घेतल्याचे पटेल यांनी सांगितले. 

यानंतर 1996मध्ये झालेल्या निवडणुकांवरही पटेल यांनी परखड मत मांडले. ते म्हणाले, 'या निवडणुकीत काँग्रेसचे 145 खासदार निवडून आले होते. देवेगौडा, मुलायमसिंह यादव, लालुप्रसाद तसेच डाव्या पक्षांचे नेते यांनी, "पवारांनी पुढाकार घेतला, रावांना बाजुला केलं तर आम्ही सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहोत", असे म्हटले. मात्र, राव यांनी ऐकले नाही. त्यामुळे काँग्रेसने देवेगौडा यांना बाहेरून पाठिंबा दिला.' यातील बहुतेक घडामोडी माझ्या घरातच घडत होत्या असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुढे काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये राव यांनी माघार घेतली मात्र, तेथेही पवार नकोत म्हणून सीताराम केसरी यांना पुढे करण्यात आले. अध्यक्षपदाची माळ केसरींच्या गळ्यात पडली. 11 महिन्यांनी केसरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर 125 खासदार शरद पवार यांच्या दारात आले. संसदीय नेतेपदी शरद पवार यांची निवड करावी आणि सीताराम केसरी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असे ठराव एकमताने मंजुर करण्यात आले. त्यावेळी देवेगौडांच्या जागी पवारांना पंतप्रधानपद मिळू शकले असते. मात्र, केवळ पक्ष फुटू नये म्हणून पवार यांनी त्यावेळी नरमाईची भूमिका घेऊन माघार घेतली. यामुळे पवारांचे दोनदा पंतप्रधानपद हुकले अशी खंत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.     

       
 

संबंधित बातम्या