नीरव मोदीला न्यायालयाचा झटका

Dainik Gomantak
मंगळवार, 9 जून 2020

1400 कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

मुंबई

पंजाब नॅशनल बॅंकेतील हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला सोमवारी विशेष न्यायालयाने झटका दिला. मोदीची तब्बल 1400 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश पीएमएलए विशेष न्यायालयाने दिले.

मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. सी. बरडे यांनी मोदीची मालमत्ता ताब्यात घेण्याची परवानगी सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाला दिली. मोदी इंग्लंडमधील वॉण्डसवर्थ तुरुंगात आहे. पीएनबी बॅंकेत सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणावर सध्या तेथील न्यायालयात सप्टेंबरमध्ये पुढील सुनावणी होणार आहे.
नीरव मोदी आणि त्याचा निकटवर्तीय मेहुल चोक्‍सी यांनी पीएनबी बॅंकेतून बोगस कर्जवाटपाद्वारे हजारो कोटींचा गैरव्यवहार केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. चोक्‍सीलाही न्यायालयाने फरार घोषित केले आहे; मात्र प्रकृतीचे कारण देऊन तो भारतात येणे टाळत असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. बनावट कागदपत्रे दाखल करून आणि बोगस कंपन्या दाखवून मोदीने पीएनबी बॅंकेत गैरव्यवहार केला. त्यामुळे या बॅंकेवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.

30 दिवसांची मुदत
मालमत्ता जप्तीच्या आदेशाविरोधात दाद मागण्यासाठी नीरव मोदीला 30 दिवस देण्यात आले आहेत. त्यानंतर सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभाग मालमत्तेच्या जप्तीशी संबंधित कारवाई करू शकतात, असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले.
 

संबंधित बातम्या